गणरायाला आज निरोप

विसर्जनाची तयारी पूर्ण ; फिरत्या हौदांची शहरात व्यवस्था
गणरायाला आज निरोप

पुणे : महापालिकेने गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण केली असून, कोरोनामुळे गणरायाला रविवारी (ता. १९) साधेपणाने निरोप दिला जाणार आहे. महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह क्षेत्रीय कार्यालये, नगरसेवक आणि आगामी निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांकडून सुमारे दोनशे फिरते हौद विसर्जन सेवेत असणार आहेत. मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रही निश्चित करण्यात आले आहेत.

महापालिकेच्या घनकचरा विभागाने ११ दिवसांसाठी ६० फिरते हौद भाड्याने घेतले आहेत. १५ क्षेत्रीय कार्यालयांनी सुमारे ६० हौदाची व्यवस्था केली आहे. नागरिकांना फिरत्या हौदांची जास्त वेळ वाट पाहाण्यास लागू नये यासाठी नगरसेवकांनी स्वखर्चातून विसर्जनाची व्यवस्था केली आहे. सुरुवातीला फिरत्या हौदांची संख्या ३३ होती. मात्र, आता ती पन्नासच्या जवळपास गेली आहे.

पुढील काही महिन्यांत महापालिकेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांपर्यंत पोहचण्याची संधी साधत या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी फिरत्या हौदाची व्यवस्था केली आहे. शहरात विसर्जनासाठी दोनशेपेक्षा जास्त हौदांची व्यवस्था असणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

नागरिकांनी मूर्ती विसर्जन करण्याऐवजी त्या दान कराव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यास पुणेकरांचा पाठिंबा मिळत आहे. शहरात २६३ मूर्ती संकलन केंद्र आहेत. गणेशोत्सवात तयार झालेले निर्माल्य नदी, नाले, ओढे, कालव्यात टाकू नये, यासाठी निर्माल्य संकलन केंद्रांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. महापालिकेने ठिकठिकाणी कर्मचारी नियुक्त केले आहेत. तसेच शहरातील विसर्जन व्यवस्थेची नागरिकांना माहिती होण्यासाठी प्रभागात महत्त्वाच्या ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ही माहिती देण्यात असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली.

गणरायाला आज निरोप
पुणे शहरात आज नवे पावणेदोनशे कोरोना रुग्ण

वाघोलीतील खाणीत विसर्जन

शहरात संकलित केलेल्या मूर्ती व फिरत्या हौदांत विसर्जित केलेल्या मूर्तींचे शास्त्रीय पद्धतीने विसर्जित करण्यासाठी महापालिकेने वाघोली येथे खाण भाडेतत्त्वावर घेतली आहे. तेथे दोन पाळ्यांमध्ये महापालिकेचे कर्मचारी मूर्तींचे विसर्जन करणार आहेत. आतापर्यंत ६० हजार ३५५ मूर्ती विसर्जित केल्या आहेत. गेल्यावर्षी गणेशोत्सवात १ लाख ६२ हजार मूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.

  1. फिरते विसर्जन हौद -200

  2. मूर्ती संकलन केंद्र-263

  3. निर्माल्य संकलन केंद्र - 280

  4. अमोनिअम बायकार्बोनेट केंद्र - 285

नदी घाटावर बंदी

कोरोनामुळे निर्बंध लागू असल्याने नदीच्या घाटासह परिसरातील विसर्जन हौदांवर नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून या ठिकाणी विसर्जनास बंदी घालण्यात आली आहे. या भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरातील रस्तेही बंद करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

नागरिकांना घरच्या घरी गणपतीचे विसर्जन करता येण्यासाठी २०० टन अमोनिअम बायकार्बोनेटची खरेदी महापालिकेने केली आहे. त्याचे वाटप करण्यासाठी २८५ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात आतापर्यंत ५५ हजार ३६४ किलो अमोनिअम बायकार्बोनेट वाटप करण्यात आले आहे.

-अजित देशमुख,

प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com