स्वत: डिटेक्टिव्ह बनत शेतकऱ्याने शोधले चोर

स्वत: डिटेक्टिव्ह बनत शेतकऱ्याने शोधले चोर

लोणी काळभोर : चोरी कशाची होते?...बहुधा सोने, चांदी, गाडी किंवा जे सहजगत्या पळवता येऊ शकेल व महागडे असेल याची...पण कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे चोरट्यांनी चक्क घरबांधणीसाठी एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याने आणलेले बांधकामाचे स्टीलच पळवले. शेतकऱ्याने पोलिस ठाण्याचे सतत पाच दिवस उंबरे झिजवले. मात्र पोलिसांनी त्याची दखलच घेतली नाही. मग घामाच्या पैशातील 80 हजारांच्या स्टीलचे चोरटे शोधण्यासाठी शेतकरीच स्वतः डिटेक्टिव्ह बनला. मग शेतकऱ्याने आपल्या काही मित्रांच्या मदतीने तीन गावातील प्रमुख रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. स्टिल चोरुन नेण्यासाठी वापरलेला टेंपो शोधला, चोरटे पाहिले, चोरट्यांचा 
शोध घेतला. नावेही निष्पन्न केली व पोलिसांकडे दिली... मग पोलिसांनी हालचाली करीत मुख्य म्होरक्यासह पाच आरोपी पकडले. एका शोधाची ही कहाणी अशी यशस्वी झाली.

दिनेश बाळासाहेब काळभोर (वय- 46, रा. कवडीगाव, कदमवाकवस्ती, ता. हवेली) हे त्या डिटेक्टीव्ह शेतकऱ्याचे नाव असुन, दिनेश काळभोर बांधत असलेल्या कवडीमाळवाडी 
रस्त्यालगतच्या बांधकामावरुन बारा दिवसांपूर्वी चोरट्यांनी बांधकामासाठी वापरण्यात येणारे दोन टन स्टील चोरुन नेले होते. पोलिस टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात येताच, दिनेश काळभोर यांनी कवडीमाळ, कवडीपाट टोलनाक्याबरोबरच, मांजरी खुंर्द व मांजरी बुर्दुक गावातील सीसीटीव्हीचे फुटेज पाहून चोरीचे स्टिल घेऊन जाणाऱ्या टेंपोचा माग काढला. तसेच टेंपोमालक व चोरट्यांची नावे निष्पन्न करुन, मिळवलेली माहिती पोलिसांना दिली. या माहितीच्याआधारे पोलिसांनी स्टिल चोरी करणाऱ्या मुख्य म्होरक्यासह पाच जणांना अटक केली. 

दिनेश काळभोर यांचे स्टिल चोरुन नेल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी, संदीप रविंद्र काळभोर (वय- 24, रा. रायवाडी, लोणी काळभोर) या मुख्य आरोपीसह सागर 
प्रकाश काळभोर (वय- 20, रा. विठ्ठल नंदीराजवळ, लोणी काळभोर) व चेतन सुभाष पवार (वय- 26, रा. रायवाडी) या तिघांना स्टिल चोरीसाठी वापरलेल्या टेंपोसह अटक केली आहे. तर त्यांचे दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले आहे.

संदीप काळभोर व त्याच्या साथीदारांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत वरील टोळीने कवडी व माळवाडी परिसरात पाच ठिकाणचे स्टिल चोरल्याची कबुली दिली. पाचपैकी दिनेश काळभोर व श्रीमंत चतुर्भुज यांच्या स्टिलच्या चोरीचे गुन्हे 
गुन्हे दाखल करुन घेतले असून, उर्वरीत लोकांचे गुन्हे दाखल करण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. 

दिनेश काळभोर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कवडी-माळवाडी रस्त्यावर दिनेश काळभोर यांनी महिनाभरापूर्वी बाधकाम सुरु केले आहे. 16 नोव्हेबर रोजी दिनेश काळभोर यांनी एका खाजगी दुकानातून बांधकामासाठी वापरण्यात येणारे दहा टन स्टिल आणले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनेश काळभोर 
बांधकामावर आले असता, त्यांना स्टिलची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ लोणी काळभोर पोलिस ठाण्यात जाऊन घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करण्याएेवजी, दिनेश काळभोर यांच्याकडून केवळ साध्या कागदावर अर्ज लिहून घेतला. मात्र, गुन्हा दाखल करण्याबाबत दिनेश काळभोर यांनी 
विचारना करताच दिनेश काळभोर यांना पोलिस ठाण्यातून पोलिसांनी हाकलून दिले. तरीही गुन्हा दाखल करावा व चोरट्यांचा तपास लागावा या मागणीसाठी काळभोर यांनी 
सलग तीन दिवस पोलिस ठाण्यात फेऱ्या मारल्या. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. 

गुन्हा दाखल करण्यास पोलिसांकडून नकार मिळताच, दुखावलेल्या दिनेश काळभोर यांनी पाच दिवसांपूर्वी बांधकामाजवळ असलेल्या कृष्णा पालखे व राहुल कदम यांच्या 
कार्यालयात जाऊन त्यांच्याकडे 16 नोव्हेंबरच्या पूर्ण रात्रीच्या सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली. यात दिनेश काळभोर यांना मध्यरात्रीच्या सुमारास पाचजण एका टेंपोमधून दिनेश काळभोर यांचे स्टिल नेत असल्याचे दिसून आले. त्यानंतर दिनेश काळभोर यांनी टोलनाक्यावर जाऊन नवजीवन हॉस्पिलमधील सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली असता, स्टिल नेणारा टेंपो पुण्याकडे जात असल्याचे काळभोर यांना आढळून आले. यावर दिनेश काळभोर यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने हडपसर, मांजरी बुद्रुकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हॉस्पिलमधील सीसीटीव्हीच्या फुटेजची पाहणी केली असता, स्टिल नेणारा टेंपो कोलवडीहून थेऊरफाट्यावर आल्याचे दिनेश काळभोर यांना 
आढळून आले. दिनेश काळभोर यांनी सीसीटीव्हीच्या फुटेजची काळजीपूर्वक पाहणी केली असता, सदर टेंपो हा संदीप काळभोर याच्या मालकीचा असल्याचे दिसून आले. यावर दिनेश काळभोर यांनी संदीप काळभोर याच्याकडे विचारणा केली असता, संदीपने सुरवातीला उडवाउडवीचे उत्तरे देण्यास सुरवात केली. मात्र, दिनेश काळभोर यांनी त्यांच्याकडे असलेले सीसीटीव्हीचे फुटेज दाखवले असता संदीपने चोरीची कबुली दिली.

दरम्यान, दिनेश काळभोर यांनी लोणी काळभोरचे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख दयानंद गावडे यांची भेट घेऊन सीसीटीव्हीच्या फुटेज पोलिसांच्या हवाली केले. त्यानंतर मात्र पोलिसांनी तात्काळ वरील पाच जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली. यात संदीप काळभोर व त्याच्या सहकाऱ्यांनी पाच ठिकाणचे स्टिल चोरल्याची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com