विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

कळस : उजनीच्या बॅकवाॅटरलगतची पाण्याची परिस्थिती भीषण झालेली आहे. उपलब्ध पाण्यातून शेतातील पिकांना जीवदान देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्घटना गुरूवारी (ता. 16) सायंकाळी घडली.

रुई (ता. इंदापूर) येथील नाराणय (पिंटू) शिवाजी लावंड या शेतकऱ्याचा पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने धक्का लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेने सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाणी मिळविण्यासाठी उजनीलगतच्या शेतकऱ्यांनाही जीवघेणी धडपड करावी लागत असल्याचे पुन्हा समोर आले आहे.

पळसदेव येथे उजनी धरणाच्या बॅकवाॅटरलगतच्या चारीवर अनेक विद्युतपंप आहेत. येथून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जलवाहीनीव्दारे पाणी नेले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाण्याची पातळी कमालीची घटली असल्याने, विद्युतपंपापासून पाणी दुरवर गेले आहे. ते पंपापर्यंत या - ना त्या मार्गाने पोचविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. यासाठी मोठी चर खोदणे, पाईपची संख्या वाढविणे, वाढीव विद्युतपंपाव्दारे मुख्य विद्युतपंपापर्यंत पाणी पोचविणे अशा क्लृप्त्या शेतकरी लढवत आहेत. शिवाय वीज असेल त्या वेळेत विद्युतपंपाजवळ थांबून रहावे लागत आहे. रात्रीचा दिवस करुन शेतकरी आपल्या शेताच्या बांधापर्यंत पाणी पोचविण्याचे प्रयत्न करताना दिसत आहेत. असाच प्रयत्न करणाऱ्या नारायण लावंड या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. वीजेचा धक्का लागून तो गतप्राण झाला. इतर शेतकऱ्यांनी विज वितरण कंपनीला मोबाईलवरुन याबाबत कल्पना देवून वीज पुरवठा खंडीत करण्याची विनंती केली. यानंतर त्याला इंदापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, तालुक्यातील बॅकवाॅटरलगतच्या गावातील शेतकरी एकमेकांची अडवणूक करत असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे. बॅकवाॅटरहून पाईपलाईन करण्यासाठी शेतकऱ्यांची इतर शेतकऱ्यांकडून अडवणूक होत आहे. पाईपलाईनसाठी चर खोदाई करण्यासाठी शेतकरी पाईपलाईनधारक शेतकऱ्याकडे पैशाची मागणी करत आहे. पैशाचा हा आकडा लाखांचा घरात आहे. सामूहीकपणे पाईपलाईन करणाऱ्यांना आता कोट्यवधीचा खर्च करावा लागत आहे. एवढा खर्च करुनही पाण्यासाठी जीव गमवावा लागत असल्याने, याबाबत बळीराजा शेतकरी संघाच्यावतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संघाचे अनिल खोत यांनी दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com