शेतकरी झाला सिक्‍युरिटी गार्ड!

योगीराज प्रभुणे
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

पुणे - गावातलं पाणी संपलं आता राहायचं तरी कसं? एक-एक गडी गावातून बाहेर पडू लागलाय... कुणी मुंबईला गेलं, तर कुणी औरंगाबादला; मी आलो तडख पुण्याला... आता मी ‘सिक्‍युरिटी गार्ड’ म्हणून काम करतोय... हे बोलताना सर्जेराव लोंढे यांच्या चेहऱ्यावरील अगतिकता स्पष्ट दिसत होती. कारण, दुष्काळामुळे एक शेतकरी आता ‘सिक्‍युरिटी गार्ड’ झालाय...

पुणे - गावातलं पाणी संपलं आता राहायचं तरी कसं? एक-एक गडी गावातून बाहेर पडू लागलाय... कुणी मुंबईला गेलं, तर कुणी औरंगाबादला; मी आलो तडख पुण्याला... आता मी ‘सिक्‍युरिटी गार्ड’ म्हणून काम करतोय... हे बोलताना सर्जेराव लोंढे यांच्या चेहऱ्यावरील अगतिकता स्पष्ट दिसत होती. कारण, दुष्काळामुळे एक शेतकरी आता ‘सिक्‍युरिटी गार्ड’ झालाय...

यंदा मराठवाड्यात तुरळक पाऊस पडला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाणीच नाही, तर राहणार तरी कसे, लोंढे यांच्या या प्रश्‍नाने प्रत्येक मानवी मन सुन्न होऊन जातं. गाव सोडून ही माणसं आता मोठ्या शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. त्यापैकी एक असलेले लोंढे देखील तळेगाव (जि. जालना) येथून डिसेंबरमध्ये पुण्यात आले. एका-दोघांच्या ओळखीने सिक्‍युरिटी गार्डची नोकरी मिळाली. ‘‘तीन-साडेतीन एकरांच्या तुकड्यात तूर लावली होती. मोठ्या अपेक्षेने बाजरीही केली होती. पण पाऊस पडलाच नाही. डोळ्यांदेखत उभी पिकं जळून गेली. एक-एक करत गडी लोक गावाबाहेर पडू लागले. तसा मी ही बाहेर पडलो,’’ लोंढे सांगताना त्यांचा स्वर कापत होता. 

पुण्यातील स्थलांतराचा इतिहास
पुण्यात २००१ ते २०११ दरम्यान विकासाचा दर ३०.१९ टक्के आहे. याच दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेचा विकास दर ७१.७६ टक्के आहे. ७१.७६ पैकी ६० टक्के वाढ ही केवळ स्थलांतरामुळे झाली आहे. ४० टक्के वाढ ही नैसर्गिक आहे. येथे रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने दुष्काळग्रस्त भागातून स्थलांतर झाले आहे.

 हे सगळे कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात. मराठवाडा आणि विदर्भातील मागास भागातून हे स्थलांतर होते. पिंपरी-चिंचवडमध्ये २००१ मध्ये १५० अघोषित झोपडपट्ट्या होत्या. तर, २०११मध्ये त्या २११ झाल्या. हे स्थलांतरित नागरिक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात.

दुष्काळामुळे शहरात येणाऱ्या स्थलांतरितांचे प्रमाण आगामी दिवसांत निश्‍चित वाढणार आहे. दुष्काळग्रस्त भागातून कामाच्या निमित्ताने लोक सहज पुण्यात येऊ शकतात. मुंबईमध्ये ओळख नसल्यास तेथे काम मिळण्यात त्रास होतो. त्या तुलनेत पुण्यात सहज काम मिळते.
- प्रा. प्रशांत बनसोडे, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था.

आतापर्यंत स्थलांतर हे पुणे-मुंबई अशा महानगरांमध्ये होत असते. पण, आता जिल्हा-तालुका पातळीवरही स्थलांतर होताना दिसत आहे. मात्र, रोजगारासाठी महानगरांमध्ये येणाऱ्या अनेक स्थलांतरितांच्या हातांनाही काम नाही, ही स्थिती भयावह आहे. त्यामुळे काय करायचं, या चिंतेने लोक घायाळ झाल्याचे चित्र यंदा दिसत आहे. 
- प्रा. चंद्रकांत पुरी, अर्थतज्ज्ञ 

सरकारने हे करावे...
  दुष्काळाची स्थिती बघून कुटुंबनिहाय जगण्यासाठी आवश्‍यक गोष्टी         पुरविणे 
  घर, स्वच्छतागृह अशा विकासाचे निकष आता थांबवता येतील.         कारण आता जीव वाचवणे आवश्‍यक 
  पक्ष, संघटना काही बघू नका, फक्त दुष्काळ बघावा
  माणसाला जगण्यासाठी काय हवे आहे, त्याला प्राधान्य द्यावे

Web Title: Farmer Drought Security Guard