Pune : कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

leopard

Pune : कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत

मंचर - आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव-खडकी येथील मधल्या मळ्यात कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या सोमवारी (ता.२०) पहाटे विहिरीत पडला आहे. बिबट्याला पाहण्यासाठी विहिरीच्या सभोवती नागरिकांची गर्दी झाली आहे.

वनखात्याचे कर्मचारी घटनास्थळी आले असून विहिरीतून बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी त्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. शेतकरी गणपत कोंडाजी बांगर यांच्या मालकीची विहीर आहे.

विहिरीजवळ १५ ते २० फुट अंतरावर घर व गायींचा गोठा आहे. सोमवारी पहाटे कुत्री जोरात भुंकत होती.कुत्र्याचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सकाळी साडेआठ वाजता कृषी पंप सुरु करण्यासाठी शेतकरी संतोष बबन बांगर विहिरीतील पाणी पाहत होते.

बिबट्याची व त्यांची नजरानजर होताच बिबट्याने डरकाळी फोडली. त्यांनतर बांगर यांनी तेथून धूम ठोकली. बिबट्या विहिरीत पडल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मथाजी पोखरकर व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी वनखात्यातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.

मंचर वनपरीक्षेत्र कार्यालयाच्या अधिकारी स्मिता राजहंस, वनपाल संभाजीराव गायकवाड, शशिकांत मडके यांच्यासह वनकर्मचार्यांनी बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती तयारी सुरु केली आहे. दरम्यान विहिरीवर झालेली नागरिकांची गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम वनकर्मचाऱ्यांनी सुरु केले आहे.