शेतकऱ्यांच्या मुलींसाठी चंदनकन्या योजना

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

इंदापूर - केंद्र व राज्य सरकार युवती सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवीत आहे. मात्र, राज्यात शेतकऱ्यांनी प्रथमच पुढे येऊन शेतकऱ्यांच्या मुलींसाठी चंदनकन्या योजना सुरू केली आहे. महाराष्ट्र चंदन उत्पादक संघाने यासाठी पुढाकार घेतला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत या योजनेअंतर्गत अर्ज भरता येणार आहेत, अशी माहिती संघाचे समन्वयक अमोल रोंघे व मनीषा माने यांनी दिली.

महाराष्ट्र चंदन उत्पादक संघाचे राज्यभरात २ हजार सभासद असून, सुरवातीस ही योजना फक्त सभासदांसाठी होती. मात्र, त्यानंतर ही योजना सर्व शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी सुरू करण्यात आली. २७ जुलैपासून शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास सुरवात झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट आहे. सप्टेंबरपासून ही योजना सुरू करण्यात येणार असून, सुरवातीस पहिल्या टप्प्यात २ ते ३ हजार शेतकऱ्यांची नोंदणी केली जाणार आहे. जे शेतकरी संघाचे सभासद नाहीत, त्यांना संघाचे सभासद करून घेतले जाणार आहे. नोंदणीनंतर शेतकऱ्यांना मुलींच्या नावे लागवडीसाठी २० चंदनाची झाडे जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध करून त्यांना चंदन लागवडीसंदर्भात शास्त्रोक्त मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे.

लागवडीनंतर एक वर्षाने चंदन झाडांची नोंद महसूल कागदपत्रावर घेणे, चंदन झाडांची तोडणी व वाहतूक परवाना काढणे यासाठी संघाच्या वतीने निःशुल्क मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच संघामार्फत झाडांची सर्वोच्च बाजारभावाने खरेदी करण्याची हमी संघाने दिली आहे.

येथे करा नोंदणी...
या योजनेसाठी इच्छुकांनी ७०३८४४३३३३ या व्हॉटसॲप क्रमांकावर संपर्क साधावा. योजनेत सहभागी होण्यासाठी मुलगी तसेच वडिलांच्या आधार कार्डची झेरॉक्‍स, तसेच अर्जासोबत सहभाग शुल्क ११०० भरून नोंदणी करावी लागणार आहे. 

एकरकमी १५ ते २० लाख...
योजनेअंतर्गत १ ते १० वर्षे वयाची मुलगी असलेल्या शेतकऱ्यांनी शेतात बांधावर २० चंदनाची झाडे लावायची आहेत. ही झाडे १२ वर्षे सांभाळल्यानंतर मुलीचे शिक्षण, तसेच लग्नासाठी एकरकमी शेतकऱ्यांना १५ ते २० लाख रुपये संबंधित शेतकऱ्यांना मिळू शकतात, अशी माहिती महाराष्ट्र चंदन उत्पादक संघाचे समन्वयक अमोल रोंघे यांनी दिली. 

Web Title: Farmer girl Chandankanya Scheme