शेतकरी म्हणतात, या सरकारचा काय फायदा?

Farmer
Farmer

भवानीनगर - सरकारने २५ रुपये सरसकट प्रतिलिटर दुधाला दर जाहीर केला; मात्र सरकारनेच मेख मारली आणि दूध संस्थेकडून न्याय मिळाला नाही. मी आजवर अनेक प्रयोग केले, उच्च दुधाळ आनुवंशिकतेच्या गायी पैदास केल्या. पण मलाही ५ रुपयांच्या अनुदानासह जर २२,२३ रुपये प्रतिलिटर दर मिळत असेल, तर अनुदानाचा कालावधी संपल्यावर मला १७-१८ रुपयेच दर मिळणार, मग दूधउत्पादक म्हणून मला या सरकारचा काय फायदा? बेलवाडीतील प्रगतिशील व प्रयोगशील दूधउत्पादक भीमराव जामदार त्यांची व्यथा सांगत होते.

पंधरा वर्षांपूर्वी मुक्तसंचार गोठ्याची पद्धत राबविणारे, गीर गायीपासून उच्च दुधाळ उत्पादनाच्या व आनुवंशिकतेच्या गायींची पैदास केल्याबद्दल उत्कृष्ट गोपालक म्हणून पुरस्कार मिळालेले भीमराव जामदार गेल्या काही दिवसांपासून व्यथित आहेत. त्यांनी अनेक प्रयोग केले. त्यांच्या प्रयोगांची दखल राज्यस्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत घेतली गेली. त्यांच्याकडे उच्च आनुवंशिकतेच्या आठ गायी असून २० ते २२ लिटर दूध देणाऱ्या गायी आहेत.

सध्या त्यांचे दररोज १०० लिटरपर्यंत दूधउत्पादन होते. सरकारने प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला, त्याचा त्यांना कसा फायदा झाला याची माहिती विचारल्यानंतर त्यांनी ही व्यथा बोलून दाखवली.

ते म्हणाले, ‘‘दूधउत्पादकांची नेहमीच चेष्टा होते. चलनी पैसा बाजारात फिरवता येतो म्हणून दूध उत्पादक धंदा करीत आहेत. त्यांच्यापुढे काहीच पर्याय नाही म्हणून सरकार व दूध संस्था एकत्रितपणे त्यांची परवड करीत आहेत. वास्तविक पाहता मला २५ रुपये प्रतिलिटर मिळायला हवे होते. आतापर्यंत अगदी अपवाद म्हणून जास्तीत जास्त २४ रुपये दर मिळाला.

मात्र सरासरी २२ रुपयांपेक्षा पुढे मलाही काही दर मिळालेला नाही. म्हणजेच ज्या दिवशी हे अनुदान बंद होईल, त्या दिवशी तर माझ्या दुधाला १७ रुपये एवढाच भाव मला मिळणार आहे. असे दुधाचे दर मिळणार असतील तर काय उपयोग? सरकारने दूध संस्थांना वेळेत अनुदान दिले नाही, तर तेही अनुदान वेळेत मिळेल याची खात्री नाही. म्हणूनच सरकार आणि दूध संस्थांच्या कात्रीत दूधउत्पादक सापडल्याने निराशा वाढत चालली आहे. २५ रुपये दर मिळेल ही आशा आता सोडून देण्याची मानसिकता आम्ही केली आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com