नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पाण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांना साकडे

राजकुमार थोरात
सोमवार, 9 एप्रिल 2018

याचिका दाखल करण्याचे शेतकऱ्यांना आश्‍वासन...
प्रशासनाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशाचा विचार करुन नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यास नकार दिला होता.प्राधिकरणाच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये याचिका दाखल करुन शेतकऱ्यांसाठी नीरा नदीमध्ये पाणी का सोडण्यात येवू नये अशी याचिका दाखल करणार असल्याचे आश्‍वासन खासदार राजू शेट्टी यांनी दिले असल्याचे निरवांगीचे माजी सरंपच दशरथ  पोळ यांनी सांगितले.

वालचंदनगर : नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यास प्रशासनाने नकार दिल्यानंतर इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी खासदार राजु शेट्टी यांची भेट घेतली.

धरणातुन नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतकऱ्यांनी गेल्या महिन्यामध्ये रास्तरोको आंदोलन करुन कोरड्या नदीच्या पात्रामध्ये आठ दिवस उपोषण केले होते. वीर धरणातुन नीरा नदीमध्ये पाणी सोडल्यास नीरा डाव्या व उजव्या कालव्यावरील उन्हाळी हंगामीसाठी सुरु असलेले पाण्याचे आवर्तन विस्कळीत होवून लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास अडचण होईल.तसेच  महाराष्ट्र  जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचे निर्दशाचा विचार करता पाणी सोडणे उचित नसल्याचे सांगून पाणी सोडण्यास प्रशासनाने नकार दिला होता.

नदीकाठच्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेवून पाण्याच्या प्रश्‍नामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली.शेट्टी यांनी नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रातील सर्व धरणांचे पाण्याच्या नियोजनाची माहिती घेणार असल्याचे सांगितले.तसेच खडकवासला धरणाचे ३.९ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला गेल्या अनेक वर्षापासुन का मिळत नाही ? याची चौकशी करणार असून  पुढील पंधरा दिवसामध्ये पाण्यासाठी इंदापूर तालुक्यामध्ये शेतकरी मेळावा अायोजित करण्याचे अाश्‍वासन दिले.  

निरवांगीचे माजी सरपंच दशरथ पोळ,विठ्ठल पवार, शंकर होळ, दादासाहेब सुळ, शरद जाधव, महादेव चव्हाण, दत्तात्रेय पोळ, विष्णू काळे, ज्ञानदेव साळुंके, शंकर येळे, नितीन जाधव व शेतकरी संघटनेचे अमरसिंह कदम यांनी राजू शेट्टी यांच्याशी पाण्यासाठी भेट घेवून चर्चा केली. 

याचिका दाखल करण्याचे शेतकऱ्यांना आश्‍वासन...
प्रशासनाने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या निर्देशाचा विचार करुन नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यास नकार दिला होता.प्राधिकरणाच्या विरोधामध्ये न्यायालयामध्ये याचिका दाखल करुन शेतकऱ्यांसाठी नीरा नदीमध्ये पाणी का सोडण्यात येवू नये अशी याचिका दाखल करणार असल्याचे आश्‍वासन खासदार राजू शेट्टी यांनी दिले असल्याचे निरवांगीचे माजी सरंपच दशरथ  पोळ यांनी सांगितले.
 
Web Title: farmer meet raju shetty for water in Pune