जादा मिळालेले साडेपाच लाख बॅंकेला केले परत

महेंद्र शिंदे
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

बॅंकेकडून तुम्हाला तुमच्या रकमेपेक्षा काही लाख रुपये जादा मिळाल्याचे घरी आल्यावर तुमच्या लक्षात आले तर तुम्ही काय कराल. यावर प्रत्येकाचे मत भिन्न असेल. पण एका गरीब आणि मोठी आर्थिक नड असणाऱ्या शेतकऱ्याने बॅंकेतून मिळालेली तब्बल साडेपाच लाख रुपयांची रक्कम पुन्हा बॅंकेत आणून दिली. कडूस (ता. खेड) येथील या शेतकऱ्याच्या प्रामाणिकपणाची खेड तालुक्‍यात चर्चा सुरू आहे.

 

कडूस : बॅंकेकडून तुम्हाला तुमच्या रकमेपेक्षा काही लाख रुपये जादा मिळाल्याचे घरी आल्यावर तुमच्या लक्षात आले तर तुम्ही काय कराल. यावर प्रत्येकाचे मत भिन्न असेल. पण एका गरीब आणि मोठी आर्थिक नड असणाऱ्या शेतकऱ्याने बॅंकेतून मिळालेली तब्बल साडेपाच लाख रुपयांची रक्कम पुन्हा बॅंकेत आणून दिली. कडूस (ता. खेड) येथील या शेतकऱ्याच्या प्रामाणिकपणाची खेड तालुक्‍यात चर्चा सुरू आहे.
 
कडूसच्या नेहेरे शिवारातील या प्रामाणिक शेतकऱ्याचे नाव आहे शिवाजी ज्ञानेश्वर नेहेरे. नेहेरे यांना कडूस येथील राजगुरुनगर सहकारी बॅंकेच्या शाखेतून काही कर्ज घेतले होते. ही रक्कम आणण्यासाठी नेहेरे शुक्रवारी बॅंकेत गेले. सर्व सोपस्कार उरकून त्यांनी दुपारी दोनच्या सुमारास ही रक्कम बॅंकेतून घरी आणली. आणलेले पैसे मुलगा राहुल याला मोजायला सांगितले. त्यात तब्बल साडेपाच लाख रुपये जास्त भरले. ही रक्कम बॅंकेतून जास्त आल्याचे नेहेरे पिता-पुत्रांच्या लक्षात आले. ते रकमेसह तातडीने पुन्हा बॅंकेत गेले.

मुख्य म्हणजे तोपर्यंत ग्राहकाला अधिक रक्कम गेल्याचे बॅंकेत कोणाच्याही लक्षात आले नव्हते. रक्कम किती दिली, याची नेहेरे यांनी रोखपालाकडे खात्री केली. रक्कम बरोबर दिल्याचे रोखपालाचे म्हणणे होते. साडेपाच लाख रुपये जास्त आल्याचे नेहेरे यांनी कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून देत ही रक्कम बॅंकेचे शाखा व्यवस्थापक दिलीप काळोखे व कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केली.

दोनशे रुपयांच्या नोटांचे बंडल समजून दोन हजाराच्या नोटांचे बंडल रोखपालाकडून नजरचुकीने अदा केल्याने नेहेरे यांच्याकडे जास्त रक्कम गेल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. जादा आलेली रक्कम नेहेरे यांनी प्रामाणिकपणे पुन्हा आणून दिल्याने बॅंक शाखा व्यवस्थापक दिलीप काळोखे, कर्मचारी धनेश सरडे, नामदेव वारे व कर्मचाऱ्यांनी नेहेरे यांचे आभार मानले व गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान केला.

बॅंकेच्या संचालिका विजया शिंदे यांनी नेहेरे यांचे फोन करून कौतुक केले. बॅंकेला केलेल्या सहकार्याबद्दल नेहेरे यांचा बॅंकेच्या वतीने बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे संचालिका शिंदे यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Return 5.5 Lakh Cash To Bank