कर्जबाजारीपणाला कंटाळून निमदरीला शेतकऱ्याची आत्महत्या

दत्ता म्हसकर
बुधवार, 9 मे 2018

 निमदरी ता.जुन्नर येथील कैलास तुकाराम घुले (वय ५०) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. बुधवारी (ता.९) रोजी पहाटे शेतातील विहिरीजवळ असलेल्या बाभळीच्या झाडाला फाशी घेतल्याचे आढळून आले आहे. कर्ज बाजारीपणामुळे केलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

जुन्नर : निमदरी ता.जुन्नर येथील कैलास तुकाराम घुले (वय ५०) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. बुधवारी (ता.९) रोजी पहाटे शेतातील विहिरीजवळ असलेल्या बाभळीच्या झाडाला फाशी घेतल्याचे आढळून आले आहे. कर्ज बाजारीपणामुळे केलेल्या आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

कैलास तुकाराम घुले यांनी नेहमीप्रमाणे रात्री दहाच्या सुमारास जेवण केले. त्यानंतर उशिरा ही घटना घडली. घुले यांच्यावर बँकेचे शेतीसाठी व मुलांच्या शिक्षणासाठी जवळपास पाच लाखांहून अधिक रकमेचे कर्ज होते. कर्जासाठी वारंवार होणाऱ्या तगाद्याने गेल्या काही दिवसांपासून ते तणावाखाली वावरत असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तीनी पुढाकार घ्यावा व शासनाने कर्जमाफी करून या कुटुंबाला दिलासा द्यावा अशी मागणी अमित घोलप यांनी केली आहे.

Web Title: Farmer suicides in Nimdari due to indebtedness