पावसाअभावी बळिराजा संकटात 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

पुणे - राज्यात खरीप पिकांच्या 98 टक्‍के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. यंदा शेतीच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून व्यक्‍त करण्यात आली आहे. 

पुणे - राज्यात खरीप पिकांच्या 98 टक्‍के क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने ओढ दिल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. यंदा शेतीच्या उत्पादनात घट होण्याची शक्‍यता कृषी विभागाकडून व्यक्‍त करण्यात आली आहे. 

राज्यात खरीप पिकांचे सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) 140 लाख हेक्‍टर आहे. त्यापैकी आजअखेर 137 लाख हेक्‍टरवर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र, यंदाच्या पावसाळ्यात ठाणे, पालघर, रत्नागिरी, पुणे, सातारा, वाशिम आणि गडचिरोली या केवळ सात जिल्ह्यांत शंभर टक्‍के पाऊस झाला आहे. अन्य 17 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75 टक्‍के, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये त्यापेक्षाही कमी पावसाची नोंद झाली आहे. 

पुणे विभागातील अनेक गावे तहानलेली आहेत. पावसाअभावी तसेच कॅनॉलमधून शेतीला पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे पिकांची वाढ झालेली नाही. त्यामुळे बळिराजा संकटात सापडला आहे. पुणे विभागात 39 तालुक्‍यांपैकी केवळ आठ तालुक्‍यांत शंभर टक्‍के पाऊस झाला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यांत तसेच कोल्हापूर विभागातील सांगली जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

पिके सुकू लागली 
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाअभावी बाजरी आणि सूर्यफूल ही पिके सुकू लागली आहेत. तसेच भुईमूग, कापूस आणि तूर पिकांची वाढ खुंटली आहे. 

भात, मूग, उडीद आणि कापूस - नाशिक विभाग 
कापूस, मका आणि मूग - औरंगाबाद विभाग 
सोयाबीन - अमरावती विभाग 
कापूस, सोयाबीन आणि भात (या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव) - नागपूर विभाग 

Web Title: farmer trouble due to lack of rain