२५ गावातील शेतकऱ्यांचे पाण्यासाठी रास्तारोको आंदोलन

राजकुमार थोरात   
मंगळवार, 20 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी इंदापूर (पुणे) व माळशिरस (साेलापूर) तालुक्यातील २५ गावातील शेतकऱ्यांनी  निरवांगी (ता.इंदापूर) येथे रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनामध्ये महिलांनीही उत्सफुर्तपणे सहभाग घेतला होता.

वालचंदनगर (पुणे) : नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी इंदापूर (पुणे) व माळशिरस (साेलापूर) तालुक्यातील २५ गावातील शेतकऱ्यांनी  निरवांगी (ता.इंदापूर) येथे रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनामध्ये महिलांनीही उत्सफुर्तपणे सहभाग घेतला होता.

जानेवारीपासुन नीरा नदीचे पात्र कोरडे पडले असल्याने इंदापूर व माळशिरस तालुक्यातील सुमारे २७ बंधारे कोरडे पडले आहेत. पाणी नसल्यामुळे नदीकाठच्या गावामधील शेतकरी व नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहे. पाणीपुरवठा योजना बंद पडल्या असून पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाल्यामुळे आज मंगळवारी (ता. २०) सकाळी साडेदहा वाजता नदीकाठच्या २५ गावातील शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.

सुमारे एक तास बावडा ते बारामती रस्ता अडवून धरला. यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित रणवरे, अॅड.कृष्णाजी यादव, विलास वाघमोडे, सरपंच दशरथ पोळ, हर्षल रणवरे, राजू भाळे, अजिनाथ कांबळे, सुभाष जाधव या शेतकऱ्यांनी मनोगते व्यक्त करुन प्रशासनाने तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली.

आंदोलनामध्ये नीरा -भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, मोहन दुधाळ, खोरोचीचे सरपंच संजय चव्हाण, नंदकुमार पाटील, वीरसिंह रणसिंग, बापूराव रणवरे, पप्पा बंडगर यांनी सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी सुद्रिक यांनी निवेदन देऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. दरम्यान अभिजित रणवरे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधून शेतकरी पाण्यासाठी आक्रमक झाले असून तातडीने पाणी सोडण्याची मागणी  केली.यावेळी कोल्हे यांनी दुरध्वनीवरुन पाणी सोडण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे सांगितले.    

नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यासाठी इंदापूर व माळशिरस तालुक्यातील ३० शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ जलसंपदामंत्री विजय शिवतरे यांच्याकडे मागील आठवड्यामध्ये गेले होते. सकाळी ९ वाजता गेलेल्या शेतकऱ्यांना शिवतरे यांनी ९ तासानंतर सायंकाळी पाच वाजता भेट दिली. व दोन मिनटांमध्ये तुमचा प्रश्‍न सांगा, मला लग्नाला जायाचा आहे असे सांगितले. शिष्टमंडळातील एका शेतकऱ्यांने पाण्याविषयी माहिती सांगत असताना मंत्री तुम्ही आहे की,मी आहे आहे? असे उत्तर दिल्याने शेतकरी नाराज झाले होते. मात्र आम्ही नाराज झालो असलो तरीही आमच्यासाठी नव्हे तर आमच्या  मुलांबाळासाठी,जनावरांसाठी बापू नीरा नदीमध्ये पाणी सोडा अशी मागणी शेतकऱ्यांनी रास्तारोकाे आंदोलनामध्ये जलसंपदामंत्री शिवतरे यांच्याकडे केली आहे. 
 

Web Title: farmers from 25 villagers do rashta roko for water