'शेतकऱ्यांना चुकीची माहिती देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मार्च 2017

पुणे - आंबा पिकविण्यासाठी शेतकरी आणि व्यापारी यांना चुकीची माहिती देऊन रसायनांचा वापर करण्यास लावणाऱ्या कंपन्यांवरच कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

पुणे - आंबा पिकविण्यासाठी शेतकरी आणि व्यापारी यांना चुकीची माहिती देऊन रसायनांचा वापर करण्यास लावणाऱ्या कंपन्यांवरच कारवाई केली जाईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

मार्केट यार्ड येथे पणन मंडळातर्फे आयोजित आंबा महोत्सवाचे उद्‌घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी पणन मंडळाचे डॉ. किशोर तोष्णीवाल, मिलिंद आकरे, सुनील पवार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आंबा पिकविण्यासाठी कॅल्शिअम कार्बाईडची पावडर आणि रसायनांचा वापर केला जातो. अशाप्रकारे आंबा पिकविणाऱ्या व्यापाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जाते. शेतकरीदेखील आंबा पिकविण्यासाठी रसायनांचा वापर करतात, या प्रकाराबद्दल पत्रकारांनी विचारले असता देशमुख म्हणाले, ""या प्रश्‍नाच्या मुळाशी जाऊन तो सोडविला पाहिजे. दोष हा संबंधित कंपन्यांचा आहे. कृषी विभाग या संदर्भात नियंत्रण करीत असून, अन्न व औषध विभागालाही सूचना दिल्या आहेत.'' 

या वर्षी हवामानाने साथ दिल्याने शेतमालाचे उत्पादन चांगले झाल्याचे नमूद करीत देशमुख म्हणाले, ""शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. संत्रा महोत्सवाचे सध्या आयोजन केले जात आहे. या वर्षी आंब्याचे उत्पादन चांगले झाले असून, त्याला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्यातील सर्व मोठ्या शहरांत आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. यापुढील काळात काजू, बेदाणा आदी शेतमालाचेही महोत्सव आयोजित केले जातील.'' 

राज्यात दीड लाख हेक्‍टर क्षेत्रावर आंब्याचे चार लाख 23 हजार 432 मेट्रिक टन इतके उत्पादन होण्याची शक्‍यता आहे. राज्यात तुरीचे उत्पादन चांगले झाले असून, आधारभूत किमतीनुसार तुरीची आत्तापर्यंत 29 लाख क्विंटल इतकी खरेदी झाल्याचे त्यांनी नमूद केले. 

पुण्यात मार्केट यार्ड येथे, त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात 1 एप्रिल ते 10 एप्रिल या कालावधीत आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड), पिंपरी- चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृह येथेही आंबा महोत्सव आयोजित केला जाईल. प्रत्येक आठवडेबाजारातही आंबा विक्री होणार आहे. परराज्यांतदेखील आंबा महोत्सव आयोजित करण्याचे प्रयत्न आहेत, अशी माहिती तोष्णीवाल यांनी दिली. 

Web Title: Farmers against companies that misinformation