जुन्नरला बियाण्याची खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

दत्ता म्हसकर
रविवार, 3 जून 2018

जुन्नर :  दोन दिवसांच्या पावसामुळे जुन्नर तालुक्यातील बळीराजा सुखावला असून खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला वेग आला आहे. जुन्नर तालुका खरेदी विक्री संघात बियाणे खरेदीसाठी आज रविवारी (ता.3) रोजी गर्दी वाढली होती.

जुन्नर :  दोन दिवसांच्या पावसामुळे जुन्नर तालुक्यातील बळीराजा सुखावला असून खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला वेग आला आहे. जुन्नर तालुका खरेदी विक्री संघात बियाणे खरेदीसाठी आज रविवारी (ता.3) रोजी गर्दी वाढली होती.
तालुक्यात पावसाने गेल्या दोन दिवसात दमदार हजेरी लावली असून शुक्रवारी (ता.1) 70 तर शनिवारी (ता. 2) 41 मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम आदिवासी भागातील काही गावातून तुरळक पाऊस झाला आहे. भात रोपवाटिकेत भातरोप टाकण्याची तयारी पूर्ण झाली असून धूळ वाफेवर रोपे टाकण्याच्या कामास काही ठिकाणी सुरवात करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. भातासाठी पारंपरिक बियाण्याचा वापरव करण्याकडे कल असला तरी आता शेतकरी सुधारीत भात बियाणे मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे दिसून येत आहे.

खरेदी विक्री संघाने भाताचे इंद्रायणी,भोगावती,फुले समृद्धी व हलवा जातीच्या बियाण्याची मागणी नोंदविली आहे.यापैकी उपलब्ध बियाण्याची विक्री सुरू असून संघात इंद्रायणीचे 150, भोगावती 150, फुले समृद्धी 40 व हळवा 800 क्विंटल बियाणे शिल्लक आहे. तर सोयाबीन 500, तूर, मूग, उडीद प्रत्येकी दोन क्विंटल बियाणे शिल्लक आहे .शेतकऱ्याच्या मागणीनुसार प्रमाणित बियाणे भरपूर शिल्लक असून संघाकडील गुणवत्तापूर्ण प्रमाणित बियाण्याचा वापर शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन व्यवस्थापक बाबाजी शिरसाठ यांनी केले आहे.

खरीप हंगामात कृषी विभागाच्या वतीने यावर्षी 300 हेक्टर क्षेत्रात विविध पीक प्रात्यक्षिक घेण्यात येणार आहे. यात भात व बाजरी प्रत्येकी 50, सोयाबीन 130, भुईमूग 40, तूर, मूग, उडीद प्रत्येकी 10 हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याचे सहाय्यक तालुका कृषी अधिकारी बापू रोकडे यांनी सांगितले.
 

Web Title: farmers' crowds for purchase seeds at junnar