शेतकऱ्यांच्या फसवणुकीला सुरुवात - फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

महाविकास आघाडीकडून आता शेतकऱ्यांच्या फसवणुकीला सुरुवात झाली आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केली. 

पुणे - ""आम्ही शेतकरी कर्जमाफीचे आश्‍वासन न देताही कर्जमाफी केली; पण शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीने जाहीरनाम्यात "संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरा करू', असे आश्‍वासन देऊन शेतकऱ्यांचे केवळ दोन लाखांचे कर्ज माफ केले. महाविकास आघाडीकडून आता शेतकऱ्यांच्या फसवणुकीला सुरुवात झाली आहे,'' अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालापात देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, खजिनदार सुनील जगताप उपस्थित होते. 

""केंद्र सरकारला एका राज्यासाठी शेती कर्जमाफीचा निर्णय घेता येत नाही. त्यामुळे देशात ज्या राज्यांनी कर्जमाफी केली आहे, त्यांनी स्वत:च्या जिवावर हा निर्णय घेतला. त्यामुळे महाविकास आघाडीने संपूर्ण कर्जमाफी करून त्यांनी स्वत: दिलेला शब्द पाळावा. तसेच अवकाळी पावसामुळे 94 लाख हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपयांची मदत देणार असे, शिवसेना सांगत होती. मात्र, सत्तेवर आल्यानंतर त्यांना काहीच दिले नाही. नागपूर अधिवेशनात 16 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांवर अनेक तास चर्चा झाली; परंतु मंत्र्यांनी अवघ्या काही मिनिटांत उत्तरे दिली. लोकांचे प्रश्‍न सुटण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे.'' 

""नागरिकत्व सुधारणा कायद्याला (सीएए) पूर्वी जे पाठिंबा देत होते, तेच आता विरोध करून जाणीवपूर्वक लोकांची डोकी भडकावत आहेत. हा कायदा कोणाचीही नागरिकता काढून घेण्यासाठी नाही, तर देण्यासाठी आहे. विरोधक मुद्दाम खोटे बोलत असल्याने त्यांना आम्ही खरे सांगण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत,''असेही फडणवीस यांनी सांगितले. 

खडसे यांना कॅगचा अहवाल समजून सांगणार 
कॅग अहवालासंदर्भातील आरोपावर फडणवीस म्हणाले, ""कॅगचा अहवाल हास्यास्पद आहे. यात कोणताही गैरव्यवहार नाही, हे अर्थमंत्री जयंत पाटील यांनीही मान्य केले. यावर एकनाथ खडसे आरोप करत असले तरी, मी त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांना कॅगचा अहवाल काय असतो, हे माहीत आहे, तरीही त्यांनाही कॅगचा अहवाल समजून सांगणार,'' असा टोलाही लगावला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers fraud started says devendra fadnavis