इंदापुरातील शेतकरी या कारणासाठी आक्रमक 

राजकुमार थोरात
Wednesday, 6 May 2020

नीरा डाव्या कालव्याच्या उन्हाळी हंगामाच्या आवर्तनास १५ मार्चपासून सुरवात झाली आहे.

वालचंदनगर (पुणे) : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी पाण्यासाठी लालपुरी व हिंगणेवाडी गावामध्ये ठिय्या मांडला होता. पोलिस व पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर पाणी देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी माघार घेतली. 

नीरा डाव्या कालव्याच्या उन्हाळी हंगामाच्या आवर्तनास १५ मार्चपासून सुरवात झाली आहे. मात्र, पाटबंधारे विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांवर पाणी पाणी करण्याची वेळ आली आहे. पाटबंधारे विभागाचे पाणीवाटपाचे नियोजन नाही. त्यामुळे निमगाव केतकी उपविभागातील सिंचनासाठी जास्त वेळ लागला. या परिसरातील सिंचनासाठी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागत आहे. त्यामुळे पश्‍चिम भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास उशीर होत आहे. पाटबंधारे विभागातील अधिकारी झालेल्या चुकीचा एकमेंकावर ठपका ठेवत आहेत. 

बारामतीतील या कामामुळे पार्किंगची समस्या दूर

सध्या इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील कळंब, वालचंदनगर, लासुर्णे, हिंगणेवाडी, कुरवली, सपकळवाडी, बेलवाडी परिसरातील शेतकऱ्यांची पिके पाण्यास आली असून, शेतकरी पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याची मागणी करत आहेत. मात्र, पाटबंधारे विभागातील अधिकारी पाणी सोडण्याचे खोटे आश्‍वासन देवून दिवस पुढे ढकलत आहेत. पाटबंधारे विभागाने ४६ क्रमांकाच्या वितरिकेला ४० क्युसेक वेगाने पाणी सोडले आहे. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे बुधवारी (ता. ६) कळंब, रणगाव, वालचंदनगर परीसरातील परिसरातील शेतकरी कळंब गावच्या हद्दीमध्ये लालपुरीजवळ पाण्यासाठी ठिय्या मांडून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. तसेच, हिंगणेवाडीमध्येही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ३६ क्रमांकाच्या वितरिकेला तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली. 
बारामती विभागाचे सहायक अभियंता अश्‍विन पवार, वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी ३६ क्रमांकाच्या वितरिकेल दोन दिवसात पाणी सोडण्याचे व ४६ क्रमांकाच्या वितरिकेला ५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्याचे आश्‍वासन दिले. 

कारवाई करण्याची मागणी... 
निमगाव केतकी उपविभागामध्ये पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून सुमारे १५० शेतकऱ्यांनी शेततळी भरल्यामुळे व मोठ्या प्रमाणात पाणी चोरी झाल्यामुळे सिंचनास वेळ लागला आहे. या प्रकरणाची चौकशी करून पाणी चोरी करणाऱ्या शेतकऱ्यांवर व पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख गणेश फडतरे व लखन साळुंके यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Indapur taluka are aggressive for water