जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरकरांना महाविकास आघाडी सरकारचा मोठा दिलासा 

रवींद्र पाटे
Sunday, 11 October 2020

जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार ४२ कोटी ६० लाख रुपयांची नुकसान भरपाई
 

नारायणगाव : तीन जून रोजी जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामूळे   उभी पीके,पशुधन व मालमत्तेच्या  झालेल्या नुकसान भरपाईपोटीची सुमारे ४२ कोटी ६० लाख रुपयांची  रक्कम मंजूर झाली आहे.ही रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया महसूल विभागाने सुरू केली आहे, अशी माहिती आमदार अतुल बेनके, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

आईसोबत बोलत थांबलेल्या तरुणावर हल्ला; तिघांनी लोखंडी सळईने केले वार​

तीन जून रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला होता.वाऱ्याचा ताशी वेग १०० किलोमीटर असल्याची नोंद खोडद येथील जीएमआरटीच्या वेदर स्टेशन मध्ये झाली होती.
कोरोनामुळे अगोदरच अडचणीत असलेला शेतकरी वादळाच्या तडाख्याने उध्वस्त झाला होता. तोडणीस आलेली हापूस आंब्याची फळे गळून मोठे नुकसान झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, दिलीप मोहिते पाटील यांच्यासह माजी लोकप्रतिनिधी यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता. नुकसानीचे पंचनामे पाच दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले  होते. महसूल व कृषी विभागाने युद्धपातळीवर काम करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर केले होते. 

डीएसके प्रकरण : उलाढालीचा रिपोर्ट अडकला लालफितीत; तपास यंत्रणेकडून दिरंगाई

दरम्यान कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आदींचे संपूर्ण लक्ष कोरोना रोखण्याकडे केंद्रित झाल्याने चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यास विलंब होत होता. या बाबत शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत होती. कामगारमंत्री वळसे-पाटील, खासदार डॉ. कोल्हे तसेच या भागातील आमदारांनी नुकसान भरपाई लवकर मिळावी यासाठी पाठपुरावा केला . पालकमंत्री पवार यांनीही विशेष लक्ष घातल्याने निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.नुकसानभरपाईची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाने महसूल विभागाकडे वर्ग केली आहे.
 शेतकऱ्यांच्या बँक  खात्यात ऑनलाईन पद्धतीने ही रक्कम पुढील आठ दिवसांत जमा होणार  असल्याची माहिती आमदार बेनके यांनी दिली.

तालुका निहाय मंजूर झालेली रक्कम पुढीलप्रमाणे : घरगुती वस्तु, कपडे आदींच्या नुकसानीपोटी

खेड: १ कोटी ४४ लाख ५० हजार रुपये ,
जुन्नर : २ कोटी १९ लाख २० हजार रुपये,
शिरूर : रु. २ लाख १० हजार रुपये.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मयत पशुधनापोटी - आंबेगाव: २१ हजार रुपये, खेड :  ३ लाख ६९ हजार रुपये,जुन्नर:१ लाख ४३ हजार रुपये.
 घरांच्या नुकसानीपोटी- शिरूर: ९ लाख १० हजार रुपये, जुन्नर: ४ कोटी २२ लाख ७० हजार रुपये, खेड :५ कोटी १६ लाख ८५ हजार रुपये, आंबेगाव: १ कोटी ४४ लाख रुपये.
 पिकांच्या नुकसान भरपाईपोटी- शिरुर: ३४ लाख १९ हजार रुपये, खेड: १ कोटी ५० लाख ६६ हजार रुपये, आंबेगाव :४ कोटी २४ लाख ५८ हजार रुपये, जुन्नर :२१ कोटी ८७ लाख २१ हजार ६४५ रुपये. 

बागायती क्षेत्र जास्त असल्याने निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका जुन्नर तालुक्यातील  शेती पिकांना बसला होता.जुन्नर तालुक्यासाठी २८ कोटी रुपये महसूल विभागाकडे नुकतेच जमा झाले असून ही रक्कम पुढील आठ दिवसांत संबधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील.-हणमंत कोळेकर, तहसीलदार जुन्नर  

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers in Junnar, Ambegaon, Khed and Shirur talukas will get compensation of Rs 42.60 crore