बारामती, नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा प्रदूषित पाण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यापुढे टाहो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmers of Baramati Neera riverbank polluted water president Bawankule

बारामती, नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा प्रदूषित पाण्यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्यापुढे टाहो

माळेगाव : नीरा नदी दूषित झाली आणि शेती उध्वस्त होण्याच्या मार्गावर असताना आम्ही लोकप्रतिनिधी गंभीर झालो आहोत. या समस्येकडे गांभीर्याने पाहत आहोत. नदी प्रदूषण करण्यामध्ये जे कारखाने कारणीभूत ठरत आहेत, त्यांची चौकशी करत तातडीने नदी स्वच्छतेची मोहीम राबवण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना लक्ष घालण्यास सांगणार आहे.

बारामती, इंदापूर तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आश्वासन आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी खांडज (ता. बारामती) येथे दिले.

बारामती तालुक्यामध्ये शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या दृष्टीने नीरा नदी प्रदूषणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नीरा नदीकाठचे शेतकरी आक्रमक होऊन लोकप्रतिनिधींना जाब विसरत आहेत, शासन स्तरावर निवेदन देत आहेत,

या गोष्टीची दखल घेत रविवारी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी बारामती तालुक्यातील सांगवी, शिरवली, खांडज आदि नदीकाठच्या गावांमधील प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

यावेळी खंडज येथील उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, भाजपचे नेते बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, मिथुन आटोळे, जी.बी. गावडे, राजेंद्र देवकाते,

अभिजीत देवकाते आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शेतकरी मिथुन आटोळे आधी शेतकऱ्यांनी नीरा नदीतील काळ्या पाण्यापासून शेतीला वाचवा आणि आम्हाला जगवा, असा ठाहो फोडत बावनकुळे यांचे नदीतील प्रदूषित पाण्याच्या समस्याकडे लक्ष वेधले.

आटोळे म्हणाले," या प्रदूषित पाण्यामुळे शेती नापीक होत असून नदीतील जलचराचे अनेक जुने वाण (मासे) नष्ट होत आहेत. गुरे ढोरे प्रदूषित पाण्यामुळे मरत आहेत. प्रदूषित पाण्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. आपण गेले अनेक वर्ष तक्रारी करून सुद्धा कोणत्याही प्रकारची उपायोजना किंवा अंमलबजावणी झाली नाही."

तोच धागा पकडत बावनकुळे म्हणाले," नीरा नदी प्रकरणाची तीव्रता विचारात घेऊन शासन स्तरावरील अधिकाऱ्यांनी नदीमधील दूषित पाण्याची दुर्गंधीचा गोपनीय अहवाल तयार केला आहे, तो अहवाल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहे. "

जमिनींसह जनावरांच्या आरोग्यावर परिणाम

फलटण - बारामती भागातील नदीकाठच्या कारखानदारांचे दूषित पाणी ( रसायनमिश्रित ) वर्षानुवर्षे नदीत सोडले जाते . परिणामी जमिनींबरोबर जनावरे , माशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे . शेकडो एकर जमीन नापीक झाली ,

तर उर्वरित जमिनीलाही त्याच मार्गावर असून , त्यामधील एकरी उत्पादनामध्ये लक्षणीय घट होत चालली आहे, अशी तक्रार शेतकरी मिथुन आटोळे यांनी केली. प्रदूषण करणाऱ्या कारखानदाराविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याची मागणीही संबंधित गावकऱ्यांनी केली.

दुहेरी संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला

नीरा नदीचे दूषित पाणी शेतीला देऊ शकत नाही , तर नीरा डावा कालव्याचे हक्काचे पाणी शेतीला मिळण्याचा कालावधी तब्बल ६० ते ७० दिवसांवर पोहोचला आहे . हा दुहेरी अन्याय नदीकाठच्या शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी किती दिवस सोसायचा ? पूर्वी दूषित पाणी निर्माण करणाऱ्या कारखानदाराविरुद्ध शेकडो शेतकऱ्यांनी रस्ता रोकोसारखी आंदोलने छेडली होती . त्या वेळी संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते.

वास्तविक, आंदोलनकर्त्यांवर गुन्हा आणि नदीमध्ये दूषित पाणी बेकायदा सोडणाऱ्या कारखानदारांना सन्मानाची वागणूक , असा उलटा न्याय आजवर पोलिस , महसूल प्रशासनांसह नेतेमंडळींनी झाला आहे, अशी प्राप्त किती खांडजकरांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिली.

टॅग्स :Pune News