रिंगरोडला भोरमध्ये तीव्र विरोध

किरण भदे
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

पुणे शहरासाठी रिंगरोड होताना शेतकरी भूमिहीन होणार असतील तर असा रिंगरोडला भोर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनी संपादित केल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

नसरापूर (पुणे) : पुणे शहरासाठी रिंगरोड होताना शेतकरी भूमिहीन होणार असतील तर असा रिंगरोडला भोर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनी संपादित केल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

भोरमधील केळवडे, साळवडे, कांजळे, शिवरे, वरवे अशा अनेक गावांत बारमाही बागायती शेती आहे. ही जमिन गेली तर शेतकरी देशोधडीला लागणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत राज्याच्या मुख्य सचिवांपासून तहसीलदार भोर यांना निवेदन दिले आहे.

याबाबत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख कुलदीप कोंडे, केळवडेचे सरपंच बाळासाहेब जायगुडे, बळिराजा शेतकरी संघाचे श्‍यामसुंदर जायगुडे, भाजपचे जीवन कोंडे, जितेंद्र कोंडे, साळवड्याचे उपसरपंच संदीप खुळे, तानाजी धुमाळ, विलास मरळ उपस्थित होते.
कुलदीप कोंडे म्हणाले, ""शेती व शेतकरी उद्‌ध्वस्त करून विकास होणार असेल तर तो नको आहे. शिवसेना कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना भूमिहीन होऊ देणार नाही. यासाठी तीव्र आंदोलन उभारले जाईल.''

असा आहे रिंगरोड

  • केळवडे (ता. भोर) येथून मुळशी तालुक्‍यातून परंदवाडी उर्से (ता. मावळ)
  • राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे काम
  • रिंगरोडच्या मान्यतेचे राजपत्र प्रसिद्ध
  • या मार्गास "पुणे पश्‍चिम रिंगरोड' असे संबोधण्यात येणार
  • राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता महामार्ग प्राधिकारी म्हणून नियुक्त
  • अनेक गावांमधून शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होणार

या रिगंरोडच्या जागेसाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता थेट गट क्रमांक राजपत्रात प्रसिद्ध करून जमीन लुटली जात आहे. या जमिनी आमच्या वडिलोपार्जित आहेत. यामध्ये आम्ही संपूर्ण आयुष्य राबलो आहे. त्या जमिनी आशा जाऊ देणार नाही. कित्येक जमिनीमध्ये फळबाग लागवड झाल्याने अनेक झाडे आहेत. ती देखिल यामुळे तोडली जाणार आहेत. हे होऊ दिले जाणार नाही.
- श्‍यामसुंदर जायगुडे, बळिराजा शेतकरी संघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers Oppose Rigroad Project In Bhor Tehesil