भोर : रांजे येथे रक्तदान करून शेतकऱ्यांचा रिंगरोडला विरोध

भोर : रांजे येथे रक्तदान करून शेतकऱ्यांचा रिंगरोडला विरोध

खेड-शिवापूर : "रिंगरोडला जमीनी देऊन आम्ही भूमिहीन होणार असून आमची कुटुंबे उघड्यावर येणार आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या जमिनी रिंगरोडला देणार नाही," अशी भूमिका रांजे (ता. भोर) गावात शेतकऱ्यांनी बुधवारी घेतली. त्यामुळे रिंगरोडची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मोजणी न करताच परतावे लागले.  

रांजे (ता. भोर) गावात बुधवारी सकाळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी रिंगरोडच्या जमीनीची मोजणी करण्यासाठी आले होते. भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार अजितसिंह पाटील, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) कार्यकारी अभियंता संदीप पाटील यावेळी उपस्थित होते.

यावेळी पाटील यांनी प्रस्तावित रिंगरोड कसा असेल याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. पाटील म्हणाले, "जमिनीचा मोबदला हा पैशाच्या स्वरूपातच मिळेल. जमिनीच्या बदल्यात जमिनी देता येणार नाहीत. प्रत्येक 500 मीटर अंतरावर अंडरपास ठेवण्यात येणार आहेत. नाले बुजविले जाणार नसून पाणंद रस्त्यांनाही अंडरपास ठेवण्यात येणार आहेत. 110 मीटर रुंदीचा रिंगरोड असणार आहे. तर सध्या रिंगरोडच्या डिझाईनमध्ये सेवा रस्ता नाही. सेकंड फेजमध्ये सेवा रस्ता करण्यात येईल." 

"किती शेतकरी भूमिहीन होणार, किती शेतकरी अल्पभूधारक होणार, रेडी रेकनर दराच्या पाच पट मोबदला मिळणार पण रेडी रेकनरचा दर किती?, सेवा रस्ता सेकंड फेजमध्ये करणार मग आत्ताच्या डिझाईनमध्ये सेवा रस्त्याचा समावेश का नाही? रिंगरोड कसा होणार हे आम्हाला समजावत बसू नका. रिंगगरोडमुळे आम्ही भूमिहीन होणार असून आमची कुटुंबे उघड्यावर येतील," असे मुद्दे मांडत उपस्थित शेतकऱ्यांनी आम्ही रिंगरोडला जमिनी देणार नाही, असे यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मोजणी न करताच परत जावे लागले.

भोरचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव म्हणाले, "शेतकऱ्यांना समजून घेण्याची आमची पहिल्यापासूनच भावना आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही बांधील आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा सर्व एकत्र येऊन या विषयावर चर्चा करून त्यावर मार्ग काढू."

रक्तदान करून रिंगरोडला विरोध-रांजे गावातील मंदिरात बुधवारी सकाळी रिंगरोड विरोधी कृती समितीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी शेतकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने रक्तदान करून रिंगरोडला विरोध केला.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com