शेतकरी निवास असूनही आम्ही झोपतोय उघड्यावर 

प्रवीण डोके
गुरुवार, 25 एप्रिल 2019

पुणे : बाजार समितीमधील शेतकरी निवास 24 तास सुरू नसल्याने विविध जिल्ह्यांतून अवेळी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. रात्री एकनंतर येणाऱ्या शेतकऱ्यांना उघड्यावरच बाहेर झोपावे लागत आहे. शेतकरी निवास 24 तास चालू ठेवल्यास शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 
 

पुणे : बाजार समितीमधील शेतकरी निवास 24 तास सुरू नसल्याने विविध जिल्ह्यांतून अवेळी येणाऱ्या शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. रात्री एकनंतर येणाऱ्या शेतकऱ्यांना उघड्यावरच बाहेर झोपावे लागत आहे. शेतकरी निवास 24 तास चालू ठेवल्यास शेतकऱ्यांचा त्रास कमी होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

शेतकऱ्यांच्या निवासासाठी बाजार समितीमध्ये भव्य शेतकरी निवासाची उभारणी करण्यात आली आहे. नाममात्र 5 रुपयांमध्ये अंघोळीसाठी गरम पाण्यासह निवासाची व्यवस्था केली आहे; परंतु रात्री एकनंतर आलेल्या शेतकऱ्यांना या निवसामध्ये प्रवेश मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना बाहेर किंवा आपल्या गाडीत झोपावे लागत आहे. 
या निवासामध्ये शेतकऱ्यांना विश्रांतीसाठी आणि अंघोळीसाठी दोन हॉल आहेत. सध्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे यातील एक हॉल बाहेर राज्यातून आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना निवडणूक होईपर्यंत निवासासाठी दिलेला आहे. 

हे निवासस्थान सकाळी 5 वाजता उघडून सकाळी 10 वाजताच बंद केले जाते. त्यानंतर ते रात्री 10 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत चालू असते. अनेक शेतकरी हे शेतमाल घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. अंतर लांब असल्याने रात्री एकपर्यंत बाजार समितीत पोचण्यात अडचणी येतात; मात्र एकनंतर निवासस्थान बंद होत असल्याने शेतकऱ्यांना कुठे झोपावे हा प्रश्न पडतो. अशावेळी शेतकरी मिळेल त्या ठिकाणी झोपून घेतो. 

''बाजार समितीमध्ये शेतमाल घेऊन यायला रात्री 2 वाजले. मी शेतकरी निवासाकडे आलो तर ते बंद होते. अशावळेस मी कुठे झोपणार हा प्रश्न पडला होता. रात्री मी शेतमाल आणलेल्या गाडीच्या शेजारी जमिनीवर झोपलो.''
- महादेव शेलार, शेतकरी, श्रीगोंदा 

''सकाळी आम्ही सगळे शेतकरी आमच्या शेतीमालाजवळ असतो. कारण सकाळी शेतीमालाचे निळव असतात. या सगळ्यात 10 वाजून जातात. त्यानंतर अंघोळीला जायचे म्हणले किंवा थोडीशी विश्रांती घ्यावी म्हटले तर शेतकरी निवास बंद झालेले असते.''
- नाना खराडे, शेतकरी, कर्जत 

''रात्री एकनंतर प्रवेश दिल्यामुळे अनेकदा वाद झाले आहेत. त्यामुळे रात्री एकनंतर प्रवेश बंद केला आहे; परंतु शेतकऱ्यांना तसा त्रास होत असेल, तर आपण धोरणात्मक निर्णय घेऊ. ''
- दत्तात्रय कळमकर, शेतकरी निवासप्रमुख, बाजार समिती 

Web Title: Farmers sleeping on the road instead of shetakari nivas