शेतकऱ्याचा मुलगा बनला यशस्वी निर्यातदार

शेतकऱ्याचा मुलगा बनला यशस्वी निर्यातदार

चौदा वर्षांपूर्वी दहा बाय दहाच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू झालेल्या उद्योगाने आता निर्यातक्षम म्हणून लौकिक कमावला आहे. कार्याचा विस्तार तीन एकरांवर पसरला असून, तिनशे कामगार काम करत आहेत. उद्योग तोट्यात गेल्याने फटका सोसला, त्यावर मात केली.

अभियांत्रिकी विशेषतः उद्योग क्षेत्राची कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना शेतकरी कुटुंबातील दादासाहेब उऱ्हे आणि शशिकांत हळदे यांनी ‘दहा बाय दहा’च्या जागेमध्ये भागीदारीने उद्योग सुरू केला. इच्छाशक्तीला जिद्द, अंगमेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणा यांची जोड देऊन त्यांनी हा उद्योग नेटाने वाढविला. ‘कन्स्ट्रक्‍शन इक्विपमेंट’साठी लागणाऱ्या काही सुट्या भागांचे एकमेव निर्यातदार म्हणूनही त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. १४ वर्षांतील त्यांनी केलेली यशस्वी वाटचाल भल्याभल्यांना थक्क करायला लावणारी आहे. 

खरे तर दादासाहेब उऱ्हे यांनी या उद्योगाचा पाया रचला, पण त्यावर कळस चढविण्यात हळदे यांनी मोलाचा वाटा उचलला. शेतकरी कुटुंबातील उऱ्हे यांचे शालेय शिक्षण राहुरीमध्ये झाले. पुढे प्रवरानगरमधून बारावी शिकून त्यांनी सोलापूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम पूर्ण केला. तेव्हापासूनच उद्योगाविषयीची बीजे त्यांच्या मनात पेरली गेली. मात्र, तुटपुंज्या कमाईत ते शक्‍य नव्हते. त्यामुळे तळेगावातील ‘नॅशनल हेवी इंजिनिअरिंग’मध्ये नोकरीचा पर्याय स्वीकारला. मात्र, उद्योगाची ओढ स्वस्थ बसू देईना. त्यातच त्यांची भेट हळदे यांच्याशी झाली. दरम्यान, इंजिनिअरिंग क्षेत्रातील १७ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे जमा झाला होता. हळदे यांच्याशी विचार जुळले आणि एकत्र येऊन उद्योग सुरू करण्याचे दोघांनीही पक्के केले. ‘टेल्को’च्या मावळ प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक एस. एस. बसिन यांची त्यांनी भेट घेतली.

उद्योजकतेला प्रोत्साहन देताना बसिन यांनी कंपनीअंतर्गत त्यांना इंजिनिअरिंगची कंत्राटी कामे दिली. समितीने कंपनीअंतर्गत कंत्राटी काम करण्यावर आक्षेप घेतल्‍यामुळे त्यांना कंपनीतून बाहेर पडावे लागले. 

हार न मानता त्यांनी तळेगाव-उर्से येथे ‘दहा बाय दहा’च्या पत्राशेडमध्ये ‘अभिजित इंजिनिअर्स’ कंपनीची स्थापना केली. त्यासाठी केवळ पाच एचपी इतकी वीजजोड घेतली. आज, या उद्योगाला चारशे एचपी क्षमतेची जोड आहे. स्थापनेनंतर तिसऱ्याच वर्षी कंपनीला मंदीचा फटका बसला. कंपनीचे अपरिमित नुकसान झाले. कर्जाचा डोंगर उभा राहिला. परंतु माघार घ्यायचीच नाही, असा निश्‍चय करून हळदे- उऱ्हे यांनी प्रयत्न सुरूच ठेवले.

त्यातूनच त्यांना ‘टेट्रापॅक’ या स्वीडिश कंपनीअंतर्गत कंत्राटी काम करण्याची संधी मिळाली. हळूहळू कंपनीने कंत्राटांचे स्वरूप वाढविले. पाठोपाठ ‘जेसीबी’, ‘ॲटलास कॉप्को’, ‘महिंद्रा’, ‘यॉर्क’ या कंपन्यांचीही कंत्राटे मिळाली. या कंपन्यांनी त्यांना ‘ॲप्रीशिएशन ॲवॉर्ड’ही दिले आहेत. 

आजमितीला कंपनीमध्ये दोनशे प्रकारचे पार्ट (जॉब्झ) बनविले जातात. त्यामध्ये ‘जेसीबी’साठी लागणाऱ्या ‘हेवी फॅब्रिकेशन’चा मोठा समावेश आहे. ‘रोड रोलर’, ‘एस्कॅव्हेटर’, ‘ॲक्‍सल्स’ (ट्रेलर), ‘कोल मायनिंग’ इक्विपमेंटच्या सुट्या भागांची बहुतांश कामे कंपनीअंतर्गत होतात. अनेक सुट्या भागांचे हळदे-उऱ्हे हे एकमेव निर्यातदार आहेत. या कंपनीत आज तीनशे कामगार काम करतात. कंपनीचे स्वत:चे ट्रेनिंग सेंटर आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com