खरीपातील पेरण्यांच्या कामाला सुरवात...

चिंतामणी क्षीरसागर
सोमवार, 25 जून 2018

तालुक्यातील उंडवडीचा भाग सोडला तर वडगाव निंबाळकर, सुपे, बारामती परिमंडल क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला आहे. जिरायत भागात वापसा असलेल्या शेतात खरीपाची पेरणीला सुरवात झाली आहे.

वडगाव निंबाळकर - गेल्या पाच सहा दिवसात समाधान कारक पाऊस पडल्याने बारामती तालुक्यातील शेतकरी पेरण्यांच्या लगबगीत आहे. सुमारे पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपातील पिकांची लागवड केली जाते त्या पैकी सुमारे दहा टक्के भागात पेरण्यांची कामे झाल्या आहेत. वापसा येईल तसे उरवरीत क्षेत्रावर पेरण्या उरकतील. 

तालुक्यातील उंडवडीचा भाग सोडला तर वडगाव निंबाळकर, सुपे, बारामती परिमंडल क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडला आहे. जिरायत भागात वापसा असलेल्या शेतात खरीपाची पेरणीला सुरवात झाली आहे. तर बागायती भागातल्या जमिनीला वापसा येईल त्यानुसार पेरण्या होतील. जुनच्या पहिल्या आठवड्यात पाऊसाची सुरवात तुरळक झाली. सर्व ठिकाणी समाधान कारक पाऊस झाला नव्हता. दुसऱ्या आठवडा कोरडा गेला. यामुळे शेतकऱ्यांमधुन चिंतेचे वातावरण होते. विशेषता सुपे मोरगावच्या जिरायती भागात पाऊसाचा पत्ता नव्हता. चार दिवसापुर्वी बुधवारी गुरूवारी तालुक्याच्या सर्व भागात समाधानकारक पाऊस झाला. विशेषता मोरगाव परिसरात सर्वाधिक ७४ मीलीमीटर पाऊसाची नोंद झाली. यामुळे जिरायती भागातील शेतकरी सुखावला आहे.

पाणीसाठा होण्याइतका मोठा पाऊस झाला नसला तरी खरीपातील पेरण्यांची कामे सुरू होण्या इतका पाऊस तालुक्यात झाला आहे. जिरायती भागात प्रामुख्याने बाजरी, तुर, मुग, हुलगा, मटकी, भुईमुग तर बागायतीमधे सोयाबीन, बाजरी, मका, सुर्यफुल पिकांची पेरणी केली जाते. वडगाव निंबाळकर परिमंडल क्षेत्रातील ४२ गावांमधुन ६ हजार २६१ हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड केली जाते यामधे वडगाव निंबाळकर, सोमेश्र्वरनगर, निंबुत, कोऱ्हाळे, पणदरे या बागायती भागात प्रामुख्याने बाजरीसह सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. ३ हजार हेक्टरवर बाजरी, त्या पाठोपाठ १२०० हेक्टरवर भाजीपाला पिकवला जाईल असा अंदाज कृषी सहाय्यक शिवाजी पवार यांनी व्यक्त केला. भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढेल असे वडगाव मंडल कृषी अधिकारी दिपक गरगडे यांनी सांगीतले. पाच जुलै पर्यंत बाजरी तर १५ जुलै पर्यंत सोयाबीन घेण्यास काही हरकत नाही. पुरेसा पावसाचा अंदाज घेउन पेरणी करावी. असे मत तालुका कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांनी व्यक्त केले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: farmers starred sowing for kharip