नारायणगाव येथे कोथिंबीर, मेथीच्या सत्तर हजार जुड्या टाकल्या कचराकुंडीत

रवींद्र पाटे
Thursday, 19 November 2020

मेथी व शेपूच्या जुडयांचा  उपबजार आवारात खच पडला होता. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी या जुड्या ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून कचरा डेपोत टाकून दिल्या.

नारायणगाव : नारायणगाव उपबजारात कोथिंबीर, मेथी व शेपू या भाजीपाल्याचे भाव मातीमोल झाल्याने जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर तालुक्यातील उत्पादक अडचणीत सापडले आहेत. भाव नसल्याने बुधवारी (ता. १८)  सायंकाळी विक्रीसाठी आणलेल्या सुमारे सत्तर हजार जुड्या नारायणगाव उपबजार आवारात सोडून शेतकऱ्यांना घरचा रस्ता धरावा लागला. यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तोटा झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

बुधवारी रात्री झालेल्या लिलावात चांगल्या प्रतीच्या कोथिंबीर व शेपूच्या जुडीला सरासरी एक रुपया तर मेथीच्या जुडीला तीन रुपये भाव मिळाला. उपबाजारात कोथिंबीर, मेथी व शेपूच्या ४ लाख ४१ हजार ४०० जुडयांची विक्रमी आवक झाली होती.

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात रोज सकाळी टोमॅटोचे, दुपारी भाजीपाल्याचे तर सायंकाळी कोथिंबीर, मेथी व शेपूचे लिलाव होतात. मागील आठ दिवसापासून कोथिंबीर, मेथी, शेपू, कोबी, काकडी, फ्लॉवर, वांगी, दोडका आदी भाजील्याच्या बाजारभावात पन्नास टक्के घट झाली आहे.

दरम्यान, बुधवारी (ता. १८) रात्री झालेल्या लिलावात प्रतवारी नुसार कोथिंबीरीच्या जुडीला शेकडा पन्नास रुपये ते चारशे रुपये, मेथीला शेकडा शंभर रुपये ते एक हजार रुपये, शेपूच्या जुडीला शेकडा पन्नास रुपये ते दोनशे रुपये या दरम्यान भाव मिळाला. मध्यम प्रतीच्या कोथिंबीर, मेथी व शेपूच्या जुड्याचे लिलाव न झाल्याने सुमारे सत्तर हजार  जुड्या उपबजारात सोडून उत्पादक शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने घरी जावे लागले. या मुळे आज सकाळी शेतकऱ्यांनी सोडून दिलेल्या कोथिंबीर, मेथी व शेपूच्या जुडयांचा  उपबजार आवारात खच पडला होता. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांनी या जुड्या ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून कचरा डेपोत टाकून दिल्या.

 पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुमारे एक लाख रुपये खर्च करून तीन एकर क्षेत्रात कोथंबीरीचे पीक घेतले होते.एक एकर क्षेत्रातील कोथंबीरीला शेकडा शंभर रुपये ते दोनशे रुपये भाव मिळाला. या बाजारभावात काढणी मजुरी, वाहतूक खर्च वसुल होत नसल्याने शिल्लक कोथंबीर विक्रीसाठी सोडून देण्याचा निर्णय घेतला.-विपुल फुलसुंदर, उत्पादक 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑगस्ट महिन्यात उपबजारात कोथिंबीर जुडीला सत्तर ते ऐंशी रुपये उचांकी भाव मिळाला होता.जून महिन्यात झालेल्या चक्री वादळामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याने मागील दोन महिने भाजीपाल्याचे भाव तेजीत होते.आता आवक वाढल्याने भावात घट झाली आहे.नुकसान टाळण्यासाठी बाजार भावाची माहिती घेऊन शेतकऱ्यांनी कोथंबीर,मेथी व शेपू विक्रीसाठी आणावी.-शरद घोंगडे, उपसचिव जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती 

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers suffer due to low market prices of cilantro and fenugreek