जमीन खरेदीसाठी शेतकऱ्यांना  मिळणार २५ लाखांचे कर्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2019

पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जमीन खरेदी करण्यासाठी कमाल २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) घेतला आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता जमीन खरेदी करण्यासाठी कमाल २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने (पीडीसीसी) घेतला आहे. या निर्णयाला नुकत्याच झालेल्या बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी देण्यात आली आहे. 

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता पीककर्जाबरोबरच जमीन खरेदी कर्जाचाही लाभ मिळू शकणार आहे. अशा पद्धतीचे कर्ज देणारी पुणे ही देशातील पहिलीच जिल्हा बॅंक ठरली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता विक्री निघालेली शेजारची जमीन खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

राज्यातील जिल्हा बॅंकांमार्फत शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामांतील विविध पिकांसाठी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येते. हे कर्ज तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजाने उपलब्ध करून देण्याचा निर्णयही देशात पहिल्यांदा पुणे जिल्हा बॅंकेने घेतला होता. त्यानुसार मागील सहा वर्षांपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याच निर्णयाच्या धरतीवर शेतकऱ्यांच्या हितासाठी शेत जमीन खरेदीसाठी कर्ज देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी सांगितले. या निर्णयानुसार जिल्हा बॅंकेचा सभासद असलेल्या शेतकऱ्यांना ११ टक्के व्याजदराने कमाल २५ लाख रुपयांचे कर्ज मिळू शकणार आहे. कर्ज घेतलेली जमीन कर्जाची परतफेड होईपर्यंत बॅंकेकडे तारण ठेवावी लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers will get loan for purchase of land

टॅग्स