esakal | इंदापुरात शेती विकायला काढलीय!
sakal

बोलून बातमी शोधा

jamin1

-घटते पाऊसमान

-कालव्याचे पाणी न मिळणे 

-पडणाऱ्या बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीस

इंदापुरात शेती विकायला काढलीय!

sakal_logo
By
ज्ञानेश्‍वर रायते ः सकाळ वृत्तसेवा

भवानीनगर (पुणे) ः इंदापूर हा राज्यातला आजवरचा दुसऱ्या क्रमांकाचा सिंचन असलेला तालुका. मात्र, गेल्या बारा वर्षांत सणसर जोड कालव्यास खडकवासल्याचे पाणीच मिळाले नाही...शेतीला आश्वासक भाव नाही, उत्पादनही नाही...आता तर नीरा देवघरचे 4.71 टीएमसी पाणीही मिळणार नाही आणि नीरा नदीतले पाणी नीरा-भीमा बोगद्यात जाणार या कल्पनेने अस्वस्थ शेतकऱ्यांकडून शेती विकायला काढली जात आहे. बड्या शेतकऱ्यांनीच शेती विकायला काढल्याने ही अस्वस्थता आणखीच वाढली आहे.

तालुक्‍यात मागच्या तीन वर्षांपर्यंत शेतीचे दर भलतेच वाढले. त्यातही इंदापूर-बारामती रस्त्याच्या कडेच्या जमिनी 30 हजार रुपये गुंठ्यावरून चार लाखांपर्यंत पोचल्या. मागील वर्षापर्यंत पालखी महामार्गामुळे त्यात भर पडत राहिली. मात्र, सरकारचे धरसोडीचे धोरण व रोखीचा तुटवडा यामुळे रस्त्याकडेच्या जमिनींचेही भावही घसरले. हे दर प्रतिगुंठा एक लाख ते अडीच लाखांपर्यंत घसरले, त्यातच आता सिंचनाच्या बाबतीत श्रीमंत गणल्या जाणाऱ्या तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातही आवर्तन वेळेवर मिळत नसल्याने त्याचा उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. जीएसटी व नोटाबंदीमुळे रोखीच्या रकमा बाजारात फिरत नसल्याने वीस ते पंचवीस लाख रुपये प्रतिएकरी पोचलेल्या जमिनीचे भाव आता घसरले आहेत.
सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे शेतीतील नैराश्‍य दिवसेंदिवस वाढू लागल्याने प्रतिष्ठित शेतकऱ्यांनीही मर्यादित जमिनी ठेवण्याचे धोरण स्वीकारल्याचे दिसते. एक एकर शेतीत कष्ट करून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा तीच जमीन विकून बॅंकेत ठेवलेल्या पैशांवर व्याज अधिक मिळत असल्याचे गणित या दृष्टीने विचारात घेतले जात आहे. मागील दोन वर्षांत अशा प्रतिष्ठित व बड्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी विकायला काढल्या व विकल्या आहेत. आताही दररोज छोटे-मोठे व्यवहार होत आहेत. गेल्या तीन महिन्यातच भवानीनगरपासून शेळगावपर्यंत वीसपेक्षा अधिक मोठे व्यवहार पार पडले आहेत. हे चित्र मागील तीन वर्षांपूर्वी एवढे वेगवान नव्हते.


बागायतदार ओळख येतेय अंगलट
या संदर्भात एका प्रयोगशील शेतकऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, पाणी वेळेवर मिळत नाही, परिणामी कर्जे फिटत नाहीत आणि कर्ज न फिटल्याने उधार व उसनवार करण्याची वेळ येते. जेवढी शेती मोठी, तेवढा तोटा अधिक आहे. पूर्वीची बडा बागायतदार ही ओळख आता अंगलट येऊ लागली आहे. मनुष्यबळाचा वाढलेला खर्च व त्या तुलनेत उत्पादनाचा व शेतीउत्पादनाच्या बाजारभावाचा बोजवारा उडाल्याने शेतीत रस राहिलेला नाही. नवी पिढी शेतीत उतरण्यास तयार नसल्याने त्या पैशाचा विनियोग एखादा व्यवसाय किंवा आर्थिक गुंतवणूक म्हणून करण्यावर सध्या भर दिला जात आहे.

loading image
go to top