'धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ धोकादायक'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ धोकादायक आहे. या टप्प्यातून युरोप गेला आहे. राजकारणात धर्माचा वापर केल्यास धर्माची मोठी हानी होते. त्यामुळे धर्माचा राजकीय शिडी म्हणून वापर करू नये. ते धर्माचे मोठे अवमूल्यन आहे, अशा शब्दांत राजकीय परिस्थितीवर ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी परखड मत मांडले. 

मुंबई - धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ धोकादायक आहे. या टप्प्यातून युरोप गेला आहे. राजकारणात धर्माचा वापर केल्यास धर्माची मोठी हानी होते. त्यामुळे धर्माचा राजकीय शिडी म्हणून वापर करू नये. ते धर्माचे मोठे अवमूल्यन आहे, अशा शब्दांत राजकीय परिस्थितीवर ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी परखड मत मांडले. 

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्याबद्दल मुंबई पत्रकार संघाने दिब्रिटो यांच्याशी पत्रकार संघात मंगळवारी वार्तालाप आयोजित केला होता. त्या वेळी दिब्रिटो यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फादर दिब्रिटो म्हणाले, लोकशाही प्रगल्भ होत आहे. प्रबळ विरोधकाशिवाय लोकशाहीला भवितव्य नाही. जेव्हा जेव्हा मूलभूत मानवी हक्कांवर गदा आली, तेव्हा तेव्हा मी त्याविरुद्ध आवाज उठवला. यापुढेही त्याविरोधात बोलणार, मी कुणाला भीत नाही. भारतीय राज्यघटनेने अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे मला व्यक्त होण्याचा अधिकार आहे, असे दिब्रिटो म्हणाले. मानवाच्या जगण्याचे विषय धर्माशी जोडले पाहिजेत. धर्मग्रंथामध्ये शास्त्रीय चिकित्सा व्हायला हवी. माझा ईश्वर शत्रूवरही प्रेम करा, याची शिकवण देतो. त्यामुळे जे मला विरोध करत आहेत, त्यांच्यावर मी प्रेमच करतो, असे दिब्रिटो म्हणाले. सहिष्णुतेची पुढची पायरी प्रेमभावना आहे. विरोधाचे स्वागत करतो. मला झालेल्या विरोधाचे मी आत्मचिंतन करतो, असेही ते म्हणाले. संतांनी एकतेची शिकवण दिली. आजच्या काळात पुन्हा एकदा संतांकडून शिकण्याची वेळ आली, याचे स्मरण दिब्रिटो यांनी करून दिले.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही दुधारी तलवार 
समाज पत्रकारांकडे ‘जागले’ म्हणून बघतोय. म्हणून पत्रकारांनी वस्तुनिष्ठ सत्याचा पाठपुरावा करावा. आमच्यासारख्या आंदोलनकर्त्यांना तुमचा आधार वाटतो, असे मार्गदर्शन फादर दिब्रिटो यांनी केले. लेखकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य म्हणजे दुधारी तलवार आहे. त्याचा गैरवापर होता कामा नये, असेही दिब्रिटो त्यांनी नमूद केले. सगळ्या प्रकारची बंदी भीतीतून येते. ही भीती असुरक्षिततेतून येते. भीतीमुक्त समाज हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे, असे दिब्रिटो म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father Francis DiBrito says The combination of religion and politics is dangerous