शिरवळजवळ बापानेच घाेटला पाेटच्या दाेन पाेरांचा गळा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

स्वतःच्या दोन मुलांचा फिरायला जायचे सांगून मुंबईहून शिरवळ येथे नेऊन गळा दाबून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खून करुन मुलांचे मृतदेह मुंबईकडे घेऊन निघालेल्या नराधामास राजगड पोलिसांनी बुधवारी पहाटे खेड-शिवापूर टोल नाक्यावर पकडले.

खेड-शिवापूर : स्वतःच्या दोन मुलांचा फिरायला जायचे सांगून मुंबईहून शिरवळ येथे नेऊन गळा दाबून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खून करुन मुलांचे मृतदेह मुंबईकडे घेऊन निघालेल्या नराधमास राजगड पोलिसांनी बुधवारी पहाटे खेड-शिवापूर टोल नाक्यावर पकडले. 

चंद्रकांत मोहिते (रा. घाटकोपर, मुंबई) असे या नराधमाचे नाव आहे. तर गौरवी चंद्रकांत मोहिते (वय 11) आणि प्रतिक चंद्रकांत मोहिते (वय 7) ही खून करण्यात आलेल्या मुलांची नावे आहेत.

याबाबत राजगड पोलिसांनी माहिती दिली. एक जण आत्महत्या करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या दोन मुलांना गाडीत बसवून साताऱ्याच्या दिशेने निघाला असल्याची माहिती राजगड पोलिसांना बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास मिळाली. मात्र तोपर्यंत सबंधित गाडी टोल नाका ओलांडून पुढे गेली होती. या गाडीचे जीपीएस लोकेशननुसार ही गाडी शिरवळहून पुन्हा परत पुण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे राजगड पोलिस खेड-शिवापूर टोल नाक्यावर दबा धरून बसले.  पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने निघालेली ही गाडी पोलिसांनी पकडली. त्या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीच्या डीकीत गौरवी आणि प्रतिक यांचे मृतदेह आढळले. पोलिसांनी चंद्रकांत याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत राजगडचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रेय दराडे म्हणाले, "चंद्रकांत याला टी.बी. चा आजार आहे. या आजाराला तो वैतागला होता. त्यामुळे आपल्यानंतर मुलांना कोणी संभाळणार नाही. म्हणून मुलांना मारू आणि आपणही मरू म्हणून त्याने घाटकोपरहून मुलांना गाडीत बसवून शिरवळ येथे आणले. त्याठिकाणी दोन्ही मुलांचा गळा दाबून खून केला. हा गुन्हा शिरवळ पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे."


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The father killed two children near shirval