धक्कादायक! वडिलांनीच बलात्कार केल्याने आईने संपविले मुलांना?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

भोसरीत रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली होती. आर्थिक चणचणीतून ही घटना घडली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. पण, आज आलेल्या शवविच्छेदन अहवालातून मुलींवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळेच आईने मुलांसह आत्महत्या केल्याची समजते. 

पिंपरी : तीन मुलांचा गळा आवळून खून करून आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेला नवे वळण मिळाले असून, वडिलांनीच दोन मुलींवर बलात्कार केल्याने आईने मुलांचा गळा आवळून आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.  

भोसरीत रविवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली होती. आर्थिक चणचणीतून ही घटना घडली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. पण, आज आलेल्या शवविच्छेदन अहवालातून मुलींवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळेच आईने मुलांसह आत्महत्या केल्याची समजते. 

अलफिया अक्रम बागवान (वय 9), झोया अक्रम बागवान (वय 7), जिआन अक्रम बागवान (वय 6) अशी या मुलांची नावे आहेत. तर फातिमा अक्रम बागवान (वय 28) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. बागवान कुटुंब मूळचे कर्नाटकमधील असून, ते गेली अनेक वर्षे वारजे-माळवाडी येथे राहत होते. तेथे ते फळविक्रीचा व्यवसाय करीत होते. मात्र, कर्जबाजारी झाल्याने अक्रम दोन वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडे येथे राहायला गेले. तेथेही त्यांना व्यवसायात जम बसविता आला नाही. त्यामुळे पाच दिवसांपूर्वी ते भोसरीत राहायला आले होते. रविवारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी चार यादरम्यान फातिमा हिने मुलगी अलफिया, झोया आणि मुलगा जिआन यांना नायलॉन दोरीने गळफास लावला. त्यानंतर दुसऱ्या खोलीत फातिमा हिने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. अक्रम सायंकाळी चारच्या सुमारास घरी आले तेव्हा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ आवाज देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. दरवाजा तोडून आत पाहिले असता तिन्ही मुले नायलॉनच्या एकाच दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळली. दुसऱ्या खोलीत फातिमाने आत्महत्या केली होती.

आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले असून, पोलिसांनी चौकशीसाठी अक्रम बागवान याला ताब्यात घेतले असता  हा खुलासा झाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father raped on daughters in Pimpri