खुनापूर्वी वडिलांकडून मुलींवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

भोसरीतील तीन मुलांच्या खून प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. आई व वडिलांनीच तिन्ही मुलांचा खून केल्याचे उघड झाले आहे. खुनापूर्वी वडिलांनी दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पिंपरी - भोसरीतील तीन मुलांच्या खून प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. आई व वडिलांनीच तिन्ही मुलांचा खून केल्याचे उघड झाले आहे. खुनापूर्वी वडिलांनी दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक केली असून, मंगळवारी त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. 

भोसरीतील नूर मोहल्ला येथील न्यू प्रियदर्शनी स्कूलजवळील इमारतीत 28 वर्षीय महिलेने स्वतःच्या नऊ आणि सात अशा दोन मुलींसह सहा वर्षीय मुलाला गळफास दिला व स्वतः आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. 28) उघडकीस आली होती. या वेळी पती बाहेर गेला होता. तो परतल्यानंतर त्याने घरमालकाच्या मदतीने पोलिसांना बोलावून त्याने दार तोडले. त्या वेळी तीनही मुले छताच्या हुकाला नायलॉनच्या दोरीला लटकलेल्या अवस्थेत होती. तर पत्नी दुसऱ्या खोलीत ओढणीला गळफास घेतलेल्या अवस्थेत होती. सुरवातीला महिलेच्या पतीने ही घटना आर्थिक अडचणीतून झाल्याचे सांगितले. मात्र, शवविच्छेदन अहवालात खुनापूर्वी दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. तिन्ही मुलांना गळा दाबून मारले. त्यानंतर नायलॉन दोरीला लटकविल्याचेही समोर आले. त्यामुळे या घटनेला कलाटणी मिळाली. 

आर्थिक विवंचनेमुळे आपण मुलांना मारून आत्महत्या करू, असे पतीने पत्नीला सांगितले. तिन्ही मुलांना मारल्यानंतर पती घराबाहेर पडला. मी घराबाहेर जाऊन आत्महत्या करतो, असे त्याने पत्नीला सांगितले. त्यामुळे पत्नीने घराला आतून कडी लावून दुसऱ्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळाने पती घरी परतला व पत्नीनेच मुलांना मारून आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. याप्रकरणी पती पत्नीवर खून, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला. अटकेत असलेल्या पतीला मंगळवारी न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने 5 ऑगस्टपर्यंत त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. 

मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात 
पोलिसांनी चारही मृतदेह महिलेच्या माहेरच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले. त्यानंतर महिलेच्या माहेरी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्‍यातील तिसरी या गावी चौघांवर मंगळवारी अंत्यसंस्कार झाले. 

अत्याचाराची माहिती लपविली 
मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पत्नीपासून पतीने लपून ठेवली का, तसेच ही बाब पत्नीपासून लपवून ठेवून आर्थिक चणचणीचे कारण पुढे करून मुलांचा खून केला का, याबाबत पोलिस तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Father rapes girls before murder