बिबट्यांची येथे प्रचंड दहशत, दोन तासांत दोघांवर हल्ला

Bibtya
Bibtya

घोडेगाव (पुणे) : नारोडी (ता. आंबेगाव) येथील हुले स्थळ नंबर 2 येथे आज सायंकाळी सहा वाजता एकावर; तर गावाच्या स्मशानभूमीजवळ रात्री आठ वाजता एकावर, अशा दोन ठिकाणी दोन वेगवेगळ्या बिबट्यांनी हल्ले केले. येथे एक दिवसापूर्वीच असाच एक हल्ला होऊन एक ग्रामस्थ जखमी झाला होता. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. 

हुले स्थळ नंबर 2 येथील अतीश शेवाळे हा सायंकाळी सहा वाजता दूध घेऊन आपल्या दुचाकीने गावातील दूध डेअरीकडे चालला होता, त्या वेळी त्याच्यावर बिबट्याने हल्ला करून पायाला पंजा मारला. प्रसंगावधान राखून त्याने तेथून पळ काढला. मात्र, या गडबडीत तो दुचाकीवरून पडला. मात्र, सावध होऊन त्याने आरडाओरडा केला. त्यामुळे बिबट्या पळून गेला.

त्यानंतर रात्री आठ वाजता गावाच्या स्मशानभूमीजवळ विवेक एरंडे हा रस्त्यावर उभा होता. या वेळी बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या डाव्या हाताला पंजाने जखमा झाल्या आहेत. दोघांवरही घोडेगाव रुग्णालयात डॉ. प्रताप चिंचोलीकर यांनी उपचार केले. 

दरम्यान, नारोडीत गुरुवारी पहाटेही पाच वाजता गोरक्ष हुले याला बिबट्याने जखमी केले होते. त्यात आज दोन हल्ले झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. 

"वन खाते नागरिकांच्या जिवाशी खेळत आहे. वन खात्याचे अधिकारी माणसाच्या मरण्याची वाट पाहत आहेत काय?' असा संतप्त सवाल अतीश याचे वडील मच्छिंद्र शेवाळे यांनी केला आहे. "काहीही करा, पण हे दोन्हीही बिबटे जेरबंद करा,' अशी मागणी सोमनाथ कदम, संजय घोडेकर, गणेश घोडेकर यांनी केली आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com