लग्नात थाटमाट नाही, पैसे-दागिनेही नाही म्हणून सासरच्यांकडून छळ; विवाहितेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

- लग्न लॉन्समध्ये लावले नाही, पैसे, दागिने दिले नाहीत म्हणून लग्नाच्या पाचव्या दिवसापासून विवाहितेचा छळ 

- सासरच्या छळास कंटाळून अखेर विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या 

पुणे : ''तिनेही इतर मुलींप्रमाणेच सुखी संसाराची स्वप्ने रंगविली होती. मात्र लग्नाच्या पाचव्या दिवसानंतरच "मुलाचे लग्न लॉन्समध्ये लावून दिले नाही, लग्नात पैसे, दागिने दिले नाहीत, इथपासून ते तुला स्वयंपाक करता येत नाही, तु आळशी आहेस, ' अशा पद्धतीने सासू,पतीच्या टोचून बोलण्याने तिच्या संसाराची सुरवात झाली. एवढेच नव्हे, तर तिला जबरदस्तीने शिळे जेवण देत तिला शारीरिक व मानकिस त्रास देत तिचा छळ केला. लग्नाच्या अवघ्या पाचव्या दिवसानंतर सुरू झालेल्या या जाचाला कंटाळून अखेर तिने ऐन नवरात्री उत्सवातच गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली ! 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

अश्‍विनी वैभव जाधव (वय 24, रा. भागीरथी नगर, साडे सतरा नळी, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अश्‍विनीचा भाऊ अनिकेत काशीद (वय 30, रा. सोमवार पेठ, कराड, सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून पती वैभव जाधव याच्यासह चौघांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण अश्‍विनी हिचे मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये वैभव जाधव याच्याशी विवाह झाला होता. लग्न झाल्यानंतर पाचव्या दिवसापासूनच पती व त्याच्या कुटुंबीयांनी तिला त्रास देण्यास सुरवात केली. "तुम्ही व्यवस्थित लॉन्समध्ये लग्न करून दिले नाही. लग्नात वस्तू, पैसे, दागिनेही केले नाहीत. लग्नात कोणत्याही प्रकारचा मानपान केला नाही' अशा शब्दात तिला दररोज टोचून बोलण्यास सुरवात केली. त्याचबरोबरच तिला शिळा स्वयंपाक खाण्यास भाग पाडले जात होते.

तब्बल पावणे अकरा लाखाच्या मेफेड्राॅनसह 16 लाखाचा मुद्देमाल जप्त; दोघाना अटक

सासूने आवाज दिल्यानंतर थोडा उशीर झाल्यामुळे ''तू बहिरी आहेस का ? तुझ्यासारखी आळशी मुलगी आमच्या वैभवला नको, तुला भावाकडे पाठवून देतो आणि त्याला दुसरी बायको करून देतो'' अशा स्वरूपाचे वारंवार टोचून बोलत तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. या सगळ्या छळाला कंटाळून अश्‍विनीने शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 

दोरीच्या साहाय्याने तिसऱ्या मजल्यावर उतरत शिक्षिकेने केली चिमुरडीची सुटका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fed up with in-law persecution Newly wed woman committed committed suicide