Rahul Gandhi Pune : ‘ते देशाचे नेतृत्व करू शकतात!’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

त्यांचा माझ्यावर प्रभाव पडला... ते देशाचे नेतृत्व करू शकतात... तरुणांच्या प्रश्‍नांची त्यांना जाण दिसते... या आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दलच्या तरुणांच्या काही बोलक्‍या प्रतिक्रिया.

पुणे  - त्यांचा माझ्यावर प्रभाव पडला... ते देशाचे नेतृत्व करू शकतात... तरुणांच्या प्रश्‍नांची त्यांना जाण दिसते... या आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबद्दलच्या तरुणांच्या काही बोलक्‍या प्रतिक्रिया.

युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि नॅशनल स्टुडंट्‌स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी यांनी शुक्रवारी (ता. ५) तरुणांशी संवाद साधला. कार्यक्रमानंतर ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने राहुल यांच्याबद्दल तरुणाईच्या भावना जाणून घेतल्या. 

कार्यक्रम संपल्यानंतरही उपस्थित तरुणाईमध्ये ‘रागा’ची चर्चा दिसून आली. कार्यक्रमात विचारलेले प्रश्‍न आणि त्याला राहुल यांनी दिलेल्या प्रत्येक उत्तरानंतर तरुण-तरुणींकडून टाळ्या वाजवत जल्लोषात प्रतिसाद दिला जात होता. या कार्यक्रमानंतर काही तरुण-तरुणींनी व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दांत...

नीरज रानडे - तरुणांचे प्रश्‍न कोणते आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, हे त्यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तरुणांवर लक्ष केंद्रित केले, हे चांगले झाले. रोजगार वाढले पाहिजेत, अर्थव्यवस्था सुधारण्याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट आहे. ते देशाचे नेतृत्व चांगले करू शकतात, असे वाटते.

सानिका मोरे - सर्वसामान्य नागरिकांसाठी ते चांगल्या योजना राबवतील, असे वाटते. त्यांच्यामध्ये सर्व देशाला सोबत घेऊन पुढे जाण्याचे ध्येय जाणवते. त्यांनी फक्त हवेत आश्‍वासने न देता वास्तव गोष्टी मांडल्या आहेत. देशातील गरिबांसाठीच्या योजना पाहिल्यास त्या मूलभूत प्रश्‍न सोडविणाऱ्या वाटतात.

दिव्या पिंपरे - तरुणांच्या प्रश्‍नांना त्यांनी चांगली  उत्तरे दिली. ते युवकांचे नेते म्हणून पुढे येत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी मांडलेली योजना चांगली आहे. ते देशासाठी चांगली धोरणे राबवू शकतील, असे वाटते. 

प्रियांशू सिंग - देश बदलण्याची ताकद तरुणांमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्‍नांवर तरुणांशी संवाद साधण्याची गरज आहे. तो संवाद आज राहुल यांनी साधला. हे पाहून समाधान  वाटले. त्यांनी आमच्यावर प्रभाव पाडला. तसेच लिखित प्रश्‍न न घेता थेट जागेवर प्रश्‍न विचारण्याची दिलेली संधी मला अधिक भावली.

Web Title: feeling of youthfulness about Rahul Gandhi