बाजारात ‘फेस्टिव्ह फीव्हर’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑक्टोबर 2019

कपडे, रांगोळी, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, कंदील, लक्ष्मीच्या मूर्तीसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ठिकठिकाणच्या दुकानांत गर्दी पाहायला मिळत होती. शाळा- कॉलेजला सुटी असल्याने नागरिक सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडल्याचे दृश्‍य अनेक ठिकाणी होते. 

पुणे- लक्ष्मीपूजनासह दिवाळीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी शुक्रवारी शहरातील बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गेले काही दिवस सायंकाळी पाऊस पडत असल्याने नागरिकांनी सकाळच्या वेळेत खरेदीला जाणे पसंत केल्याचे दिसत होते.

कपडे, रांगोळी, इलेक्‍ट्रॉनिक वस्तू, कंदील, लक्ष्मीच्या मूर्तीसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ठिकठिकाणच्या दुकानांत गर्दी पाहायला मिळत होती. शाळा- कॉलेजला सुटी असल्याने नागरिक सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडल्याचे दृश्‍य अनेक ठिकाणी होते. 

तुळशीबाग, बुधवार पेठेतील इलेक्‍ट्रॉनिक मार्केट आणि दिवे व पणत्या घेण्यासाठी कुंभारवाड्यात नागरिकांची धावपळ सुरू होती. कापड दुकानांसह इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंची बाजारपेठही असल्याने बाजीराव व शिवाजी रस्त्यावर सर्वाधिक गर्दी होती. वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सजावटीसाठी आवश्‍यक असलेल्या अनेक वस्तू कुंभारवाड्यातील दुकानांत दाखल झाल्या आहेत. गेल्या चार दिवसांपासून या कलाकुसरीच्या वस्तू घेण्यासाठी नागरिक येत असल्याची माहिती विक्रेत्यांनी  दिली. 

आकाशकंदिलांनी उजळली बाजारपेठ 
बोहरी आळी, रविवार पेठेतील अनेक दुकानांसह तात्पुरते उभारण्यात आलेले स्टॉल आकाशकंदिलांच्या प्रकाशात उजाळून निघाले आहेत. कागद आणि कापडांनी बनविलेले कंदील नागरिकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्याशिवाय लाकडी आकाशकंदिलांना मोठी मागणी आहे. साधारण २०० रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत आकाशकंदील उपलब्ध आहेत. विविध रंग आणि आकारांतील आकाशकंदील उपलब्ध आहेत. आकर्षक रंगसंगतीच्या झिरमिळ्या लावलेले आकाशकंदील लक्ष वेधून घेत आहेत.  

फटाके खरेदीला जोर 
कंदील, फराळ, पणत्या यांसह फटाके खरेदीलासुद्धा आता जोर आला आहे. फटाक्‍यांची विक्री करण्यासाठी नदीपात्रात अनेक स्टॉल उभारण्यात आले आहेत. शहराच्या इतर भागातदेखील फटाक्‍यांची दुकाने थाटली आहेत. त्यामध्ये अगदी १० रुपयांपासून दोन ते तीन हजार रुपयांपर्यंतचे फटाके आहेत. महागड्या फटाक्‍यांच्या खरेदीसाठी नागरिकांची पसंती असल्याचे विक्रेते अनुज भंडारी यांनी सांगितले. 

पावसाचा कोणताच परिणाम बाजारपेठेवर होताना सध्या दिसून येत नाही. नागरिक खरेदी करीत आहेत. ग्राहकांचा कल हा भारतीय बनावटीच्या वस्तूंकडे आहे. आयुर्वेदिक उटणे, सुगंधी तेल, साबण यांना मागणी वाढत आहे.
- योगेश परदेशी, विक्रेता

ऑनलाइन खरेदीपेक्षा बाजारपेठमध्ये जाऊन खरेदी केल्याशिवाय नवा ट्रेंड समजत नाही. बाजारपेठेमध्ये खरेदी करण्याची पारंपरिक सवय आहे. त्यामुळे उत्सवाची असलेली वेगळी मजाही घेता येते.
- सुमित कर्जुले, तरुण ग्राहक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: festival fever in pune