
सतत बदलत्या हवामानामुळे विषाणूंच्या संसर्गास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे इन्फ्लूएंझासह कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने अँटीव्हायरल औषधांची मागणी प्रचंड वाढली आहे.
Fever Cold Cough Infection : ताप, सर्दी, खोकल्याच्या औषधाची मागणी वाढली
पुणे - सतत बदलत्या हवामानामुळे विषाणूंच्या संसर्गास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे इन्फ्लूएंझासह कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने अँटीव्हायरल औषधांची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, वैद्यकीय सल्ल्यानुसारच औषधे घेण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये वेगाने बदल झाले आहेत. उन्हाचा चटका, पहाटेचा गारठा, ढगाळ वातावरण, वादळीवाऱ्यासह पडलेला जोरदार पाऊस आणि त्यानंतर वाढलेली हवेतील थंडी हे सगळे वातावरण सध्या पुणेकर अनुभवत आहेत. याचा थेट परिणाम पुणेकरांच्या आरोग्यावर होत असल्याचे दिसते.
वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सुभाष कदम म्हणाले, 'वातावरणात सतत बदल होत असल्याने शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याची व्यवस्था बिघडते. त्यातून शरीरातील रोग प्रतिकारशक्ती कमी होते. विषम वातावरणामुळे विषाणूजन्य आजारांना पोषक वातावरण झालेले असते. त्यामुळे रुग्णाला पटकन विषाणूंचा संसर्ग होतो. त्यातून आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात हा आजार सुरवातीला लहान मुलांना लवकर होतो. त्यांच्याकडून घरातील मोठ्या माणसांकडे संक्रमित होत असल्याचे दिसते.'
डॉ. श्रीकांत पाटील म्हणाले, 'यातील बऱ्याच रुग्णांना साध्या औषधोपचारावर बरे करता येते. मात्र, काही कुपोषित, लठ्ठ किंवा जन्मतः काही आजार असलेल्या रुग्णांना प्रतिजैविकांचा वापर करावा लागतो.'
औषध विक्रेते चेतन शहा म्हणाले, 'ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने अँटी व्हायरल औषधांची मागणी प्रचंड वाढली आहे. गेल्या वर्षभरात फ्ल्यूवीरसारखे प्रतिजैविकांला मागणी नव्हती. पण, आता ही मागणी वेगाने वाढत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसते.'
मास्कची मागणीत अंशतः वाढ
कोरोनामध्ये मास्कच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. मात्र, त्यानंतर मास्क वापरणे सोडून दिले होते. फक्त रुग्णालयांमधून मास्कची खरेदी होत असे. पण, आता मास्कची खरेदीत गेल्या महिन्याच्या तुलनेत काही अंश वाढ झाली आहे, अशी माहिती ऋषभ सर्जिकलचे अनुप गुजर यांनी दिली.
घाबरू नका.. जागरूक रहा
इन्फ्लूएंझा हा विषाणूंमुळे होणार आजार आहे. याचे इन्फ्लूएंझाचे ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ असे प्रकार आहेत. सध्या आढळणाऱ्या रुग्णांना ‘ए’ या उपप्रकारातील इन्फ्लूएंझाचा संसर्ग होत आहे.
लक्षणे
- ताप
- खोकला
- घशात खवखव
- धाप लागणे
- अंगदुखी
प्रतिबंधात्मक उपाय
- वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा
- पौष्टिक आहार घ्या
- लिंबू, आवळा, संत्री, हिरव्या पालेभाज्या याचा आहारात समावेश करा
- धूम्रपान टाळा
- पुरेशी झोप घ्या
- भरपूर पाणी प्या
हे करू नका
- हस्तांदोलन
- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका
- वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका
- फ्ल्यूची लक्षणे असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
यांना सर्वाधिक धोका
- गर्भवती
- लहान बाळ
- ज्येष्ठ नागरिक
- रोग प्रतिकारक क्षमता कमी असलेले रुग्ण
- वैद्यकीय आणि सर्जिकल रुग्ण
- दीर्घकालीन औषधे घेणारे रुग्ण
रुग्णांने घ्यायची काळजी
- कुटुंबात विलगिकरण कक्षात राहावे
- मधुमेह, उच्चरक्त दाबाच्या रुग्णांजवळ जाऊ नये
- घरात ब्लिच द्रावण तयार करावे. त्याने टेबल, खुर्चीसह रुग्णाचा स्पर्श होणारी वस्तू पुसावी
- दिवसातून दोन वेळा गरम पाण्यात मीठ, हळद टाकून गुळण्या कराव्या
- वाफ घ्यावी
- रुग्णाने वापरलेले मास्क, टिश्यूपेपर कुठेही टाकू नये