किरकटवाडी येथे एका कुटुंबावर दहा ते पंधरा गुंडांचा सशस्त्र हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर

किरकटवाडी येथे एका कुटुंबावर दहा ते पंधरा गुंडांचा सशस्त्र हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर

किरकटवाडी : किरकटवाडी (ता.हवेली) येथे एका कुटुंबावर दहा ते पंधरा गुंडांनी सशस्त्र हल्ला केल्याची गंभीर घटना गुरुवार दि. 3 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. हल्लेखोरांनी आजूबाजूच्या घरांच्या, वाहनांच्या काचा फोडत दहशत पसरविल्या मुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

किरकटवाडी मधील शिवनगर येथे राहणारे गणेश रिंढे, राजाराम रिंढे,विजय रिंढे यांच्यासह महिलांनाही मारहाण झाली आहे. हल्लेखोरांनी सोबत आणलेल्या काठ्या व कोयते यांनी जबर मारहाण केल्याने राजाराम रिंढे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

गणेश रिंढे यांचा शालेय गणवेश शिवण्याचा व्यवसाय आहे. शिवनगर येथील राहत्या घराजवळच त्यांचे वर्कशॉप आहे. तेथे काम करणारा कामगार शब्बीर याचा रस्त्याने जाताना एका महिलेला धक्का लागला. त्याबाबत त्याने तीन ते चार वेळा माफीही मागितली होती; परंतु त्या महिलेचा पती  सराईत गुन्हेगार अविनाश वसवे याने दहा ते पंधरा गुंडांना बरोबर घेऊन येत रात्री दहाच्या सुमारास काठ्या व कोयत्यांनी  घरी येऊन रिंढे कुटुंबावर हल्ला केला.

घटनेची माहिती मिळताच हवेली पोलिस ठाण्याची रात्रगस्तीची गाडी तात्काळ शिवनगर येथे दाखल झाली होती. जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून हवेली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची होणार तपासात मदत-कॅमेरे बंद असल्याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रसारित केल्यानंतर खडकवासला व किरकटवाडी या ग्रामपंचायतींनी तात्काळ बंद असलेले कॅमेरे दुरुस्त करून घेतले. हल्ला करण्यासाठी आलेले आरोपी अगोदर सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी फाटा येथील भार्गव दुग्धालयाच्या समोर एकत्र जमले होते. तेथून दुचाकीवर बसून सर्व आरोपी रिंढे यांच्या घराकडे गेले. आरोपींची सर्व हालचाल दोन्ही ग्रामपंचायतींच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालेली आहे. त्यामुळे आरोपींची ओळख पटविण्यासाठी व शोधासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलिसांना मोठी मदत होणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एमपीडीए नुसार होणार कठोर कारवाई-आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आलेली आहेत. आरोपींवर कलम 307 प्रमाणे हत्तेच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न आरोपींनी केल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र गंभीर गुन्हे नियंत्रण कायद्यानुसार (एमपीडीए) कठोर कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती हवेली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com