चासकमान धरणाच्या पाणीसाठ्याची फिफ्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

खेड व शिरूर तालुक्‍यासाठी वरदान ठरलेल्या चासकमान (ता. खेड) धरणातील पाणीसाठ्यात गेल्या दहा दिवसांत काहीशी वाढ झाली असून, पाणीसाठ्याने अर्धशतक पूर्ण केले आहे, मात्र मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा निम्म्याने कमी आहे. 

चास (पुणे) : खेड व शिरूर तालुक्‍यासाठी वरदान ठरलेल्या चासकमान (ता. खेड) धरणातील पाणीसाठ्यात गेल्या दहा दिवसांत काहीशी वाढ झाली असून, पाणीसाठ्याने अर्धशतक पूर्ण केले आहे, मात्र मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा निम्म्याने कमी आहे. सद्यःस्थितीत धरणात 52.95 टक्के (4.2 टीएमसी) पाणीसाठा झाला असून, मागील वर्षी याच दिवशी पाणीसाठा 97.86 टक्के होता व धरणाचे पाचही दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात विसर्ग सुरू होता. 

याबाबत धरणाचे सहायक अभियंता प्रेमचंद शिंदे व शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी माहिती दिली की, चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारपासून (ता. 25) पुन्हा पावसाला सुरवात झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून 47 टक्‍क्‍यांवरच स्थिरावलेला धरणातील पाणीसाठा पुन्हा वाढण्यास सुरवात झाली आहे. 17 जुलैपासून खेडसह शिरूर तालुक्‍यासाठी कालव्याद्वारे खरीप हंगामासाठीचे पहिले आवर्तन सुरू असून, सुमारे 550 क्‍यूसेकने धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. 

चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील श्री क्षेत्र भीमाशंकर व पश्‍चिम पट्ट्यात चांगला पाऊस सुरू आहे. या परिसरातील ओढे नाले खळखळून वाहत आहेत. हे सर्व पाणी चासकमान धरणाच्या पाणीसाठ्यात येत आहे.

  • चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असलेल्या कळमोडी धरणातून 1270 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग चासकमान धरणात होत आहे.
  • सद्यःस्थितीत चासकमान धरणात 52.95 टक्के पाणीसाठा झाला आहे.
  • कळमोडी धरण परिसरात गेल्या चोवीस तासात 77 मि.मी.; तर एक जूनपासून 715 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
  • चासकमान धरण परिसरात गेल्या चोवीस तासात 39 मि.मी. पाऊस झाला असून, एक जूनपासून 445 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fifty percent water in Chaskaman dam