वेतनवाढीऐवजी पन्नास हजारांचे बक्षीस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

पुणे - एका अपत्यावर कुटुंब नियोजन करणाऱ्या पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दोन जादा वेतनवाढी देण्यात येत होत्या. मात्र, या वेतनवाढीबाबत राज्य सरकारने कोणतेही आदेश दिले नसल्याची उपरती महापालिका प्रशासनाला सहा वर्षांनंतर झाली आहे. त्यामुळे दोन जादा वेतनवाढ देण्यास नकार देऊन आता एकदाच त्या कर्मचाऱ्याला पन्नास हजारांचे बक्षीस देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. 

राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत ज्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी 18 डिसेंबर 1998 नंतर एका अपत्यावर संतती नियमन केले आहे, त्या महापालिकेच्या कर्मचाऱ्याला दोन जादा वेतनवाढ देण्याच्या ठरावाला 28 फेब्रुवारी 2011 मध्ये सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली होती. मात्र, याप्रमाणे वेतनवाढ देण्याबाबत राज्य सरकाराने कोणतेही आदेश दिलेले नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे एका अपत्यावर संतती नियमन केलेल्या महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दोन वेतनवाढी मंजूर करण्याच्या धोरणाचा फेरविचार करणे अनिवार्य झाले आहे. 

पुणे महापालिका समाजविकास विभागाच्या माध्यमातून "लेक दत्तक योजना' राबवीत आहे. त्यात एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास पन्नास हजारांपर्यंतची रक्कम राष्ट्रीयीकृत बॅंकेत मुलीच्या नावाने गुंतविण्यात येते. त्या योजनेप्रमाणे कुटुंब कल्याण नियोजन केल्यास या कार्यक्रमांतर्गत पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना एकदाच बक्षीस म्हणून पन्नास हजार रुपये द्यावेत, असा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त शीतल उगले यांनी ठेवला आहे. 

Web Title: Fifty thousand reward instead of salary increase