शिरष्णे येथे हाणामारीत पोलिसांवर दगडफेक

Crime
Crime

वडगाव निंबाळकर - शिरष्णे (ता. बारामती) येथे रेशन दुकानदार व ग्रामस्थांमध्ये मारामारी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला असता, चिडलेल्या ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली.

यामध्ये दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिस गाडीचे नुकसान झाले आहे. रात्रीच्या अंधारात दगडफेक करणारे पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून २४ दुचाक्‍या जप्त केल्या आहेत. दोन्ही बाजूने दिलेल्या परस्परविरोधी तक्रारी व पोलिसांच्या तक्रारीवरून ५७ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोमवारी (ता. ९) रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला.

शिरष्णे येथील रेशन दुकानदार शंकर खलाटे यांच्या रेशन दुकानाबाबत ग्रामस्थांच्या अनेक वेळा तक्रारी झाल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे गावात आल्या असता, यांच्याकडे शिवाजी बिचकुले यांच्यासह ग्रामस्थांनी रेशनबाबत तक्रारी केल्या. त्यावरून दुकानदार खलाटे व तक्रारदार बिचकुले यांच्यात मारामारी झाली. बिचकुले यांना खलाटे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मिळून मारले. याचा राग ग्रामस्थांना आला. सर्व संतप्त ग्रामस्थ खलाटे यांच्यावर चालून आले. कुटुंबीयांना मारहाण करण्यास सुरवात केली. प्रसंगावधान राखून खलाटे एका किराणा मालाच्या दुकानात दार लावून लपून बसले. 

याबाबतची माहिती मिळताच फौजदार निरीक्षक विकास बडवे चार कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन घटनास्थळी गेले. दुकानाबाहेर संतप्त जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. ध्वनिक्षेपकावरून शांतता राखण्याचे आवाहन केले. खलाटे कुटुंबास दुकानाबाहेर काढत असताना जमावाने रात्रीच्या अंधारातून दगडफेक केली. यामध्ये दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले.

पोलिसांनी आणलेल्या खासगी गाड्याही जमावाने फोडल्या. परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ घटनास्थळी आले. पोलिसांची कुमक वाढल्याने जमाव पांगला. 

याबाबत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनीही आपली तक्रार नोंदवली आहे. शिवाजी शंकर बिचकुले (वय ६८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अक्षय खलाटे, विशाल खलाटे, वैभव खलाटे, शंकर खलाटे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. तसेच, रेशन दुकानदार शंकर गेनबा खलाटे (वय ५८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजी बिचकुले, आशा बिचकुले, धनंजय बिचकुले, भानुदास बिचकुले, गणपत बिचकुले, दत्तात्रेय बिचकुले, कृष्णा बिचकुले, हनुमंत बिचकुले, संतोष बिचकुले, अंकुश पडार, दशरथ शिंदे, मंगल बिचकुले, छाया बिचकुले, रतन पडार, सोनाबाई बिचकुले, शैला बिचकुले, मनीषा बिचकुले, सरूबाई शिंदे, सारिका पडार, मनीषा बिचकुले, सरोबाई शिंदे, रामचंद्र पिंगळे, विलास पिंगळे, रामचंद्र खलाटे, प्रभाकर खुटवड, प्रदीप खलाटे, लक्ष्मण जानकर, बापूराव शिंदे, संतोष वाघमारे (सर्व रा. शिरष्णे) यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. पोलिस कर्मचारी शरद वेताळ यांनी, सरकारी कामात हस्तक्षेप केल्याच्या कारणावरून जमावातील घटनास्थळावरून २५ दुचाकी जप्त केल्या आहेत. जप्त मोटारसायकलचे चालक व मालक आरोपी असल्याची नोंद गुन्ह्यात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com