पुणे : हडपसरमध्ये दोन गटात भांडणे; गोळीबारात सुरक्षारक्षकाचा हकनाक बळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

दोन गटात सुरू असलेल्या भांडणातून एका सुरक्षारक्षकाला गोळी लागल्याने या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. पंचय्या सिध्दया स्वामी (वय ५८, रा. गंगानगर लेन नंबर २) असे या घटनेतील मयताचे नाव आहे. हि घटना मंगळवारी सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास फुरसुंगा गावातील गंगानगर येथे घडली.

हडपसर (पुणे) : दोन गटात सुरू असलेल्या भांडणातून एका सुरक्षारक्षकाला गोळी लागल्याने या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. पंचय्या सिध्दया स्वामी (वय ५८, रा. गंगानगर लेन नंबर २) असे या घटनेतील मयताचे नाव आहे. हि घटना मंगळवारी सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास फुरसुंगा गावातील गंगानगर येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी गावातील गंगानगर येथे दोन गटात भांडणे सुरू होती. त्यातील एकाने दुस-या गटातील व्यक्तीवर गोळी झाडली. मात्र ती गोळी चुकून तेथून घरी चाललेल्या स्वामी यांच्या मांडीला लागली. त्यानंतर हल्लेखोर फरार झाले.

स्वामी खाली जमीनीवर पडल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिले. त्यांनंतर त्यांनी याबाबत हडपसर पोलिसांना माहिती दिली. पोलिस व नागरीकांनी स्वामी यांना हडपसर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यांचा उपचार करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॅाक्टरांनी जाहिर केले.

स्वामी हे एका सहकारी बॅंकेत सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. स्वामी यांचा मृत्यू हृदयविकाराने अथवा अतिरक्तस्त्रावामुळे झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच हल्लेखोर हे सराईत गुन्हेगार असल्याचा संशय पोलिसांना असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fighting in two groups in Pune Security guards victim in firing