विद्यापीठ परिसराचा ‘आखाडा’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

दोन संघटनांमध्ये हाणामारी; बारा जणांवर कारवाई

दोन संघटनांमध्ये हाणामारी; बारा जणांवर कारवाई

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल (ता. २४) रात्री अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’ (एसएफआय) यांच्यात झालेल्या मारहाणी प्रकरणी बारा जणांना अटक करण्यात आली होती. त्यांची आज न्यायालयाने जामिनावर सुटका केली. अशांतता माजविल्यास पुन्हा अटक करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एसएफआयचे कार्यकर्ते त्यांच्या आंदोलनाचे पोस्टर काल रात्री नऊच्या सुमारास चिकटवीत होते. ‘सोलापूर येथील तंत्रनिकेतन बंद करू’ असे एमएसएस पाठविल्याबद्दल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची विद्यार्थ्यांना दमबाजी, परिचारक यांचे सैनिकांविषयीचे आक्षेपार्ह वक्तव्य यांचा निषेध ते करणार होते. त्याचवेळी अभाविपचे कार्यकर्ते आणि त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. यात एसएफआयचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

चतु:शृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस दयानंद ढोमे म्हणाले, ‘‘विद्यापीठात नऊच्या सुमारास हाणामारी झाली. त्यात एसएफआयचे पाच जण जखमी झाले आहेत. हाणामारीसाठी कमरेचा पट्‌टा, लाकडी फळी, नारळ यांचा वापर करण्यात आला. अभाविपचे कार्यकर्ते विद्यापीठाबाहेरील होते. गर्दी जमवून मारहाण केल्याचा गुन्हा त्या कार्यकर्त्यांवर दाखल केला असून, सात जणांना अटक केली. ‘अभाविप’ने ‘एसएफआय’च्या विरोधात तक्रार केल्यानंतर त्यांच्याही पाच कार्यकर्त्यांना अटक केली होती.

विद्यापीठात असा प्रकार घडू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येणार आहे. अटक केलेल्यांपैकी पुन्हा अशांतता माजविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.’’

अटक केलेल्यांची नावे
अभाविप : राम सातपुते, राहुल चंदेल, करण शिर्के, ऋषी सरगर, अद्वैत पत्की, शार्दूल भेगडे, कुणाल सकपाळ.
एसएफआय : सतीश देबळे, संदीप मरगळ, नासीर शेख, सतीश पडोळेकर, सतीश गोरे.

विद्यापीठाबाहेरून आलेल्या तरुणांचा शोध घ्यावा - दाभाडे
स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांवर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप करीत शाहू, फुले, आंबेडकर कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी आज विद्यापीठाच्या भोजनगृहासमोर मूक निदर्शने केली. हे विद्यार्थी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून दीड तास बसून होते. पोलिसांनी समजाविल्यानंतर त्यांनी निदर्शने स्थगित केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करीत विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी हा हल्ला केल्याचा आरोप डेमॉक्रॉटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाचे सदस्य डॉ. संजय दाभाडे यांनी या वेळी केला. एसएफआयचे कार्यकर्ते जखमी झाले. त्याची नोंद ससून रुग्णालयात आहे. तरीही पोलिसांनी पाच कार्यकर्त्यांना अटक केली, याचा खेद वाटतो. विद्यापीठाबाहेरून आणलेल्या तरुणांचा शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी डॉ. दाभाडे यांनी केली.

‘एसएफआय’नेच आधी सुरवात केली - गावडे
विद्यापीठात हाणामारीबाबत ‘अभाविप’चे पुणे महानगरमंत्री प्रदीप गावडे यांना पत्रकार परिषदेत विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मुर्दाबाद असे म्हणून ‘स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया’च्या कार्यकर्त्यांनी पोस्टर फाडले. दोन विद्यार्थिनींना शिवीगाळ केली. त्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. ‘एसएफआय’च्या कार्यकर्त्यांवर कडक कारवाई केली पाहिजे.’’ महानगर सहमंत्री देवश्री खरे म्हणाल्या, ‘‘देशविरोधी घोषणा देणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही कार्यक्रम घेतला होता.

सोमवारी आमचा मोर्चा असल्याने त्याची पोस्टर आम्ही लावली होती. सायंकाळी ती एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी फाडली. ‘अभाविप मुर्दाबाद’ असे घोषवाक्‍य असलेली पोस्टर लावली. त्यातून वाद निर्माण झाला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ सुरू केली.’’ मारहाण कोणी सुरू केली, या प्रश्‍नावर खरे म्हणाल्या, ‘‘विद्यापीठातील घटनेचे फुटेज आमच्याकडे नाही, ते तपासून पाहावे लागेल.’’

सत्यशोधन समितीची नियुक्ती

‘गेल्या अनेक वर्षांत विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीचा प्रकार घडलेला नाही. विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या विचारांचा आदर करावा. टोकाची कारवाई करावी लागेल, असे कृत्य यापुढे कुणीही करू नये,’ असा इशारा देत कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी विद्यापीठातील मारहाण प्रकरणाचा तपास करण्यासाठी तीन जणांची सत्यशोधन समिती स्थापन केली आहे.

डॉ. गाडे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे; परंतु एका मर्यादेपर्यंत ते सहन केले जाईल. विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठ नेहमीच नरम भूमिका घेते; परंतु शारीरिक हिंसाचार होत असेल, तर मात्र कठोर कारवाई करावीच लागेल. विद्यापीठाचे विद्रूपीकरण होऊ देणार नाही. विद्यापीठ हे विचारांच्या आदान- प्रदानाचे केंद्र आहे. घटनेने प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य दिले आहे. त्याचा आदर सर्व संघटनांतील विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.’’

सुरक्षारक्षक वाढविणार
विद्यापीठात काल घडलेला प्रकार दुर्दैवी आहे, त्याची चौकशी करण्यासाठी तीन जणांची सत्यशोधन समिती स्थापन केली आहे. सखोल चौकशीनंतर समितीच्या अहवालानुसार संबंधित विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच, नव्या कायद्यानुसार विद्यापीठ आणि महाविद्यालयांत खुल्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सुरक्षेचे मोठे आव्हान आहे. सध्या विद्यापीठातील सुरक्षारक्षकांची संख्या कमी असल्याने दोन दिवसांत साठ सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. आठवडाभरात आणखी साठ सुरक्षारक्षक नेमले जातील, असे डॉ. गाडे यांनी सांगितले. 

अभाविप राजकारण करत आहे. त्यांनी ते करावे. परंतु विद्यार्थ्यांना त्रास होईल, विद्यापीठाची प्रतिमा मलिन होईल, असे कृत्य करू नये. विद्यार्थ्यांची मुख्य प्रवेशद्वारावरच तपासणी करून त्यांना आत सोडावे. गुंड प्रवृत्तीच्या तरुणांना विद्यापीठाने बाहेरचा रस्ता दाखवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
- सागर पवार, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

विद्यापीठात हा प्रकार घडावा, हे दुर्दैव आहे. विद्यापीठ ही पुण्याची आंतरराष्ट्रीय ओळख आहे, याचे भान अभाविपसह सर्वच विद्यार्थी संघटनांनी ठेवावे. गुन्हेगारीची कृत्ये तर करूच नयेत. हे प्रकार रोखण्यासाठी विद्यापीठाने कडक उपाययोजना कराव्यात.
- राकेश कामठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

विद्यापीठाला नॅककडून नुकतीच ‘ए प्लस’ श्रेणी मिळाली आहे. विद्यापीठ शैक्षणिक प्रगती करीत असताना त्याला बदनाम करण्याचा हा कट आहे. विद्यापीठातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ‘अभाविप’ आणि ‘एसएफआय’चा गोंधळ सुरू आहे. विद्यापीठाने दोषींवर तत्काळ कारवाई करावी. कोणत्याही संघटनेच्या प्रचार-प्रसारास बंदी घालावी.
- किरण साळी, युवा सेना

Web Title: fighting in university area