शिरष्णेमध्ये दोन गटात मारामारी ; पोलिसावर हल्ला

चिंतामणी क्षीरसागर
मंगळवार, 10 जुलै 2018

खासदार सुप्रिया सुळे गावात आल्या असता यांच्याकडे शिवाजी बिचकुले यांच्यासह ग्रामस्थांनी रेशनबाबत तक्रारी केल्या. यावरून दुकानदार शंकर व तक्रारदार बिचकुले यांच्यात मारामारी झाली.

वडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील शिरष्णे येथे रेशन दुकानदार व ग्रामस्थांमध्ये मारामारी झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला असता चिडलेल्या ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक केली. यामधे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिस गाडीचे नुकसान झाले आहे. मारामारीत आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.

रात्रीच्या अंधारात दगडफेक करणारे पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळावरून २४ दुचाकी जप्त केल्या आहेत. दोन्ही बाजूने दिलेल्या परस्परविरोधी तक्रारी व पोलिसांच्या तक्रारीवरून सुमारे ५७ जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोमवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला. येथील रेशन दुकानदार शंकर खलाटे यांच्या रेशन दुकानाबाबत ग्रामस्थांच्या अनेक वेळा तक्रारी झाल्या आहेत. 

खासदार सुप्रिया सुळे गावात आल्या असता यांच्याकडे शिवाजी बिचकुले यांच्यासह ग्रामस्थांनी रेशनबाबत तक्रारी केल्या. यावरून दुकानदार शंकर व तक्रारदार बिचकुले यांच्यात मारामारी झाली. बिचकुले यांना शंकर खलाटे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मिळून मारले याचा राग ग्रामस्थांना आला. सर्व संतप्त ग्रामस्थ शंकर खलाटे यांच्यावर चालून आले. कुटुंबियांना मारहाण करण्यास सुरवात केली. प्रसंगावधान राखून खलाटे एका किराणा मालाच्या दुकानात दार लाऊन लपून बसले.

घडलेली घटना पोलिसांना कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे चार कर्मचाऱ्यांना घेउन घटनास्थळी गेले. दुकानाबाहेर संतप्त जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. ध्वनिक्षेपकावरून शांतता राखण्याचे आवाहन केले. खलाटे कुटुंबीयांना दुकानाबाहेर काढत असताना जमावाने रात्रीच्या आंधारातून दगडफेक केली. यामध्ये दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे.

पोलिसांनी आणलेल्या खाजगी गाड्याही जमावाने फोडल्या. परिस्थिती आटोक्या आणण्यासाठी बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर बारामती शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ घटनास्थळी आले. पोलिसांची कुमक वाढल्याने जमाव पांगला. याबाबत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनीही आपली तक्रार नोंदवली आहे.

शिवाजी शंकर बिचकुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून अक्षय खलाटे, विशाल खलाटे, वैभव खलाटे, शंकर खलाटे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. विरोधी शंकर ग्यानबा खलाटे वय ५८ रेशन दुकानदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिवाजी बिचकुले, आशा बिचकुले, धनंजय बिचकुले, भानुदास बिचकुले, गणपत बिचकुले, दत्तात्रय बिचकुले, कृष्णा बिचकुले, हानुमंत बिचकुले, संतोष बिचकुले, अंकुश पडार, दशरथ शिंदे, मंगल बिचकुले, छाया बिचकुले, रतन पडार, सोनाबाई बिचकुले, शैला बिचकुले, मनिषा बिचकुले, सरुबाई शिंदे, सारिका पडार, मनिषा बिचकुले, सरोबाई शिंदे, रामचंद्र पिंगळे, विलास पिंगळे, रामचंद्र खलाटे, प्रभाकर खुटवड, प्रदीप खलाटे, लक्ष्मण जानकर, बापुराव शिंदे, संतोष वाघमारे सर्व रा शिरष्णे ता बारामती जि पुणे यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

पोलिस कर्मचारी शरद वेताळ यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याच्या कारणावरून जमावातील सुमारे ४० ते ५० जणांना दोषी ठरवून घटनास्थळावरून २५ दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपी जप्त मोटारसायकलवरील चालक व मालक असल्याची नोंद गुन्ह्यात केली आहे.

Web Title: Fights in two groups of Shirish attack on Police