शाळेच्या भिंतीवर साकारले चित्ररूपी ज्ञान (व्हिडिओ)

चऱ्होली, पठारेमळा - महापालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थी.
चऱ्होली, पठारेमळा - महापालिका प्राथमिक शाळेतील विद्यार्थी.

पिंपरी - पापुद्रे निघालेल्या रंगहीन भिंती, कोपऱ्यांना गेलेले तडे, गळके छत, जळमटलेले वर्ग हे चित्र सर्वत्र पाहायला मिळते. पण आपण त्याचा विचार किती गांभीर्याने करतो, हा खरा प्रश्‍न आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता किती बदलते, हे जाणून घेत नाही. नेमकी हीच स्थिती ओळखून महापालिकेच्या चऱ्होली- पठारे मळा येथील शाळेने आपले रूप पालटले आहे. त्यांनी शाळेची आकर्षक रंगसंगती तर केली आहेच, तसेच मुलांच्या ज्ञानात भर घालणारी माहिती तेथील भिंतीवर चित्ररूपाने चितारली आहे. त्यामुळे त्या भिंतीच जणू विद्यार्थ्यांशी बोलू लागल्या आहेत.

पहिली ते चौथीपर्यंत सेमी इंग्लिश माध्यमाची ही द्विशिक्षकी प्राथमिक शाळा निसर्गाच्या कुशीत वसते. भोसरी व वडमुखवाडी ही दोन उपनगरे जवळ असल्याने या शाळेकडे मुलांचा ओढा वाढला. खासगी शाळांऐवजी ते विद्यार्थी शाळेत यावेत, यासाठी शाळेचे शैक्षणिक वातावरण मनोरंजक असायला हवे, असा विचार करून शिक्षक अमोल भालेकर व विवेक रासकर यांनी काळवंडलेल्या भिंतींना बोलके करण्याचा निर्णय घेतला. त्यांना मदतीचा हात पुढे केला, तो शोभा आणि पंढरीनाथ पठारे या दांपत्याने. शाळेच्या वर्गखोल्या, कार्यालयाचे रंगकाम केले.

सचिन तापकीर यांनीही मुलांसाठी लोखंडी बाकडी दिले. महापालिकेने गळक्‍या छताची दुरुस्ती केली. तुटक्‍या खिडक्‍या बदलल्या. 

भिंतीवर काय पाहाल 
आकाश, तारांगण, सप्तरंगी इंद्रधनुष्य, इंग्रजी अल्फाबेट्‌स शिकविणारे छोटा भीम, मोठू-पतलू, डोरेमॉन कार्टून ही लहान मुलांना आकर्षित करीत आहेत. मराठी बाराखडी, दिशाज्ञान, व्याकरण, गणिती सापशिडी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, भूमिती, सोलर सिस्टीम, वाकप्रचार, समानार्थी-विरुद्धार्थी शब्द, भौगोलिक माहिती, इतिहास, विज्ञान, शरीर व निसर्ग विषयक माहिती, प्राणी-पक्षी याबरोबरच तबला पेटी, ढोलकी, वीणा, सारंगी अशी संगीतवाद्येही चितारलेली आहेत. आकर्षक रंगसंगती वापरून राज्याचा माहिती नकाशा, पर्यावरणाचा संदेश देणारी मुले, इंग्रजी- मराठी महिने यांची माहिती मुलांना दिली आहे. त्याचबरोबर वारली चित्रेही रेखाटण्यात आले. 

ई-लर्निंग 
लोकसहभागातून शाळा ‘डिजिटल स्कूल’कडे वाटचाल करीत आहे. विद्यार्थ्यांना बारा टॅब दिले असून, त्यामाध्यमातून मुले शिकत आहेत. दोन संगणकही दिले आहेत.

विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण दिल्यास त्याचा गुणवत्ता वाढीवर निश्‍चित परिणाम होतो. शैक्षणिक वातावरण बोलके असेल, तर आनंददायी व ज्ञानरचनावादी शिक्षण निसर्गातील रंगांच्या मदतीने मुलांच्या मनापर्यंत पोचविणे सहज शक्‍य होते. पुस्तकातील उतारे भिंतीवर चितारल्याने दप्तराचे ओझे कमी होऊन विद्यार्थी शाळेच्या परिसरात आनंदाने रमून जातो. 
- अमोल भालेकर, शिक्षक, पठारेमळा महापालिका प्राथमिक शाळा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com