तुरुंगात असलेल्या पुण्यातील या गुंडाच्या नावाने मागितली 25 लाखांची खंडणी  

crime
crime

उरुळी कांचन (पुणे) : हवेली तालुक्यातील कोरेगाव मूळ येथील कुप्रसिद्ध गुंड गोरख कानकाटे याच्या टोळीने गुन्हेगारी क्षेत्रात तब्बल चार वर्षानंतर पुन्हा डोके वर काढले असून, कानकाटे टोळीतील सहा ते सात जणांच्या टोळक्याने 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी कोरेगाव मूळ येथे देशी व विदेशी दारुची विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत कोरेगाव मूळ येथील जेनिथ वाईन्स या दुकानाचे मालक विशाल मुभाष मोहेकर (रा. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. ते व त्यांचा भाऊ सागर यांच्या मालकीचे हे दुकान आहे. विशाल हे शुक्रवारी (ता. १०)  दुपारी दुकानात बसले असताना तोंडाला कपडा बांधलेला एक तरुण दुकानात आला. त्याने मोहेकर यांच्या हातात मोबाईल फोन देऊन, गोरख कानकाटे यांच्या कार्यालयातून फोन असल्याचे सांगून त्यांना फोनवर बोलण्यासाठी दबाव टाकला. यावर मोहेकर यांनी फोन कानाला लावला असता, फोनमधून बोलणाऱ्या व्यक्तीने मोहेकर यांना, तुम्हाला जर या भागामध्ये धंदा करायचा असेल, तर तुम्हाला मंगेश कानकाटे याला २५ लाख रुपये खंडणी द्यावी लागेल. जर पैसे दिले नाही, तर तुम्हाला जिवे ठार मारीन, अशी धमकी अशी धमकी दिली. फोन बंद करताच तरुण दुकानातून निघून गेला. 

दुसऱ्या दिवसी सकाळी खंडणीचे काय झाले, असे म्हणत पाच ते सहा अनोळखी  तोंडाला रुमाल बांधलेल्या तरुणांनी लाकडी दांडकी, लोखंडी रॉड, कु-हाडीच्या साह्याने दुकानाचे व्यवस्थापक व दोन गिऱ्हाईकांना बेदम मारहाण केली. या प्रकरणाची माहिती मिळताच विशाल मोहेकर यांनी लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी मंगेश कानकाटे नावाच्या तरुणासह गोरख कानकाटे टोळीतील अज्ञात सहा जणांच्या विरोधात खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजू महानोर हे करत आहेत. 

याबाबत लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी सांगितले की, गोरख कानकाटे टोळीतील सहा ते सात जणांविरोधात 25 लाख रुपयांच्या खंडणीसाठी एका देशी व विदेशी दारुची विक्री करणाऱ्या एका व्यावसायिकाला मारहाण केल्याबाबतचा गुन्हा दाखल झाला आहे. उरुळी कांचन येथील अप्पा लोंढे खून प्रकरणात गोरख कानकाटे व त्याचे काही सहकारी मागिल चार वर्षापासून तुरुंगात आहेत. मात्र, टोळीतील काही सदस्य पॅरोलवर बाहेर आले आहेत. या प्रकरणात गोरख कानकाटे व त्याच्या सहकाऱ्यांचा हात आहे की नाही, याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. विशाल मोहेकर यांच्याकडे खंडणी मागणाऱ्यांच्या अटकेसाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. लवकरच आरोपी अटकेत असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com