
हनुमंत नाझिरकर याच्या सांगण्यावरुन काळे धन शेती उत्पन्नाचे आहे असे दाखविण्यासाठी राहुल खोमणे याने माझ्यासह इतर पाच जणांचे स्टँपपेपरवर खोटे करारनामे केले आहेत.
बारामती : अमरावतीच्या नगररचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझिरकर पत्नी संगीता नाझिरकर मुलगी गीतांजली नाझिरकर तसेच इतर तिघांवर बारामती शहर पोलिस ठाण्यात आज खोटे दस्त करारनामा करुन 2 कोटी 90 लाखांची फळे खरेदी केल्याचे भासविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी या बाबत माहिती दिली.
राहुल शिवाजी खोमणे, हनुमंत जगन्नाथ नाझिरकर, संगीता हनुमंत नाझीरकर, गीतांजली हनुमंत नाझीरकर, सतीश भीकाराम वायसे (सर्व रा. शिरवली, ता. बारामती, जि. पुणे) गुलाब देना धावडे (रा.सोमनथळी ता.फलटण जि.सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वाजली छोटू बागवान (रा. म्हाडा कॉलनी, बारामती) यांनी या बाबत फिर्याद दाखल केली आहे.
या बाबत फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे की, हनुमंत नाझिरकर याच्या सांगण्यावरुन काळे धन शेती उत्पन्नाचे आहे असे दाखविण्यासाठी राहुल खोमणे याने माझ्यासह इतर पाच जणांचे स्टँपपेपरवर खोटे करारनामे केले आहेत. आपण आंबा व चिकू शिवाय कोणतीच फळे घेतली नसताना व सव्वा लाख रुपये व्यवहारापोटी दिलेले असतानाही प्रत्यक्षात मात्र 74 लाख 40 हजार रुपयांची रक्कम दाखवली गेली. इरफान युनुस बागवान यांचा व्यवहार साडेतीन लाखांचा असताना 1 कोटी 83 लाख, मोहमद शरीफ बागवान यांची 29 लाख असे 2 कोटी 90 लाख रुपये करारनाम्यावर दाखवून फसवणूक केली आहे. पोलिसांनी या संदर्भात अदयाप कोणालाही अटक केली नाही.