esakal | घरपट्टी भरा अन्‌ पाणी, दळण मोफत मिळवा! 
sakal

बोलून बातमी शोधा

sapkalwadi1

गेल्या दोन वर्षांपासून निरनिराळे प्रयोग राबविणाऱ्या पर्यावरण संतुलित सपकळवाडी (ता. इंदापूर) गावाने आता एक अनोखा प्रयोग राबविला आहे. शंभर टक्के घरपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांस ग्रामपंचायत शुद्ध पाणी व मोफत धान्य दळून देणार आहे. त्याची चाचणी रविवारी घेण्यात आली.

घरपट्टी भरा अन्‌ पाणी, दळण मोफत मिळवा! 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शंभर टक्के वसुलीसाठी सपकळवाडी ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम 

भवानीनगर (पुणे) ः गेल्या दोन वर्षांपासून निरनिराळे प्रयोग राबविणाऱ्या पर्यावरण संतुलित सपकळवाडी (ता. इंदापूर) गावाने आता एक अनोखा प्रयोग राबविला आहे. शंभर टक्के घरपट्टी भरणाऱ्या ग्रामस्थांस ग्रामपंचायत शुद्ध पाणी व मोफत धान्य दळून देणार आहे. त्याची चाचणी रविवारी घेण्यात आली. 

सपकळवाडीत दरडोई तीन रोपे लावण्याचा उपक्रम यापूर्वीपासून राबविण्यात येत आहे. सपकळवाडी ग्रामपंचायतीने 100 टक्के घरपट्टी वसुलीसाठी अनोखा प्रयोग केला आहे. यात घरपट्टी भरण्यासाठी प्रोत्साहन देतानाच ग्रामस्थांना पायाभूत सुविधा देण्यासाठी ग्रामपंचायतीने शुद्ध पाण्याचा आरओ प्लॅन्ट उभारला आहे. त्याच्याच शेजारी धान्य दळण्यासाठी गिरणी उभारली आहे. इंदापूरचे प्रभारी गटविकास अधिकारी विनायक गुळवे, विस्तार अधिकारी किरण मोरे, रोजगार हमी योजनेचे तंत्र अधिकारी यादव, पद्माकर धर्माधिकारी आदींनी रविवारी येथे भेट देऊन पाहणी केली. या वेळी सरपंच सचिन सपकळ, उपसरपंच गीतांजली वाघमारे, सदस्या त्रिवेणी सपकळ, शत्रुघ्न घाडगे, सविता अवघडे, शिवाजी सपकळ, रवींद्र सपकळ, किरण सपकळ, राहुल सपकळ, अजित सपकळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

योजनेबाबत सचिन सपकळ म्हणाले, ""घरपट्टी शंभर टक्के भरणाऱ्या ग्रामस्थांस 100 जार एवढे पाणी मोफत दिले जाणार आहे. त्यासाठी एटीएमसारखी सुविधा उभारण्यात आली आहे. त्याचे डिजिटायझेशन झाले आहे. याखेरीज अधिक पाणी लागल्यास त्यासाठी प्रतिजार पाच रुपये आकारले जाणार आहेत. धान्याच्या बाबतीत कुटुंबाला वर्षभर लागणारे धान्य मोफत दळून दिले जाणार आहे. मात्र घरपट्टी न भरणाऱ्या कुटुंबास जर शुद्ध पाणी हवे असेल तर त्यास एक जार आठ रुपये किमतीला घ्यावा लागेल. त्यासाठी कोणतीही सवलत असणार नाही.'' 


हनुमंत सपकळ यांनी या वेळी अधिकाऱ्यांना गावाच्या विकासकामांच्या नियोजनाची माहिती दिली. 


एखादी ग्रामपंचायत करवसुलीसाठी फक्त कारवाईचा बडगा न वापरता ग्रामस्थांच्या सुविधांवरही भर देत असेल तर ते कौतुकास्पद आहे. नागरिकांनीही करवसुली ही आपल्या गावाच्या विकासासाठी महत्त्वाची आहे, हे मानून आपले कर्तव्य पार पाडायला हवे. 
- विनायक गुळवे, 
प्रभारी गटविकास अधिकारी, इंदापूर 

loading image
go to top