पवना नदीपात्रात भराव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

पिंपरी - पिंपळे गुरव येथील जवळकरनगरसह कासारवाडी परिसरात पवना नदीपात्रात सर्रास भराव टाकण्याचे आणि राडारोडा टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीचे पात्र दिवसेंदिवस अरुंद होत असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत पुढे आले.

पिंपरी - पिंपळे गुरव येथील जवळकरनगरसह कासारवाडी परिसरात पवना नदीपात्रात सर्रास भराव टाकण्याचे आणि राडारोडा टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नदीचे पात्र दिवसेंदिवस अरुंद होत असल्याचे ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत पुढे आले.

काही उद्योगांकडून सोडण्यात आलेल्या रसायनमिश्रित पाण्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. त्यातच गेल्या काही वर्षांपासून पवना नदीपात्रात भराव आणि राडारोडा टाकण्याचे काम सुरू आहे. कासारवाडी येथील स्मशानभूमीशेजारी तसेच जेआरडी टाटा उड्डाण पुलाच्या खालील नदीपात्रात महापालिकेने राडारोडा टाकला आहे. या पुलावरून नदीपात्राकडे नजर टाकली असता, डाव्या बाजूने नदीपात्र आकसत गेल्याचे दिसले.

जवळकरनगर येथील नदीच्या पात्रात भिंत बांधून राडारोडा टाकण्याचे काम जोमात सुरू आहे. राडारोड्याने भरलेले डंपर रिकामे होत असल्याचे, तसेच तो पात्रात ढकलण्यासाठी जेसीबी कार्यरत असल्याचे दिसले.

काही वर्षांपूर्वी विस्तारित असलेले नदीपात्र हळूहळू आकसल्याचे स्थानिक सांगतात. महापालिकेकडून सीमाभिंत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु, ते अद्याप पूर्ण झालेले नाही. तरीही भराव टाकण्याचे काम सुरूच आहे. नदीप्रवाहापासून ५० ते १०० फुटांपर्यंतही भराव टाकला आहे. त्यामुळे नदीला जणू ओढ्याचे स्वरूप आलेले दिसले. नदीपात्रात भराव टाकण्याचा मज्जाव करणारा कोणताही फलक येथे नाही. 

काही गृहनिर्माण सोसायट्या तर अगदी नदीपात्रालगत आहेत. त्यांना पुराचा धोका संभवतो. या संदर्भात ‘ड’ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी विजय खोराटे यांच्याशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

आमच्या विभागाच्या कर्मचाऱ्यांना कारवाईसाठी पाठवू. तसेच, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनाही पत्र देऊ.  
- पांडुरंग शेलार, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग

नदीपात्रातील भराव टाकण्याचा विषय अतिक्रमण विभागाच्या अखत्यारित येतो. जलपर्णी काढण्याचा विषय आरोग्य विभागाच्या अखत्यारित येतो.
- संजय कुलकर्णी, सहायक आयुक्त, पर्यावरण विभाग, महापालिका

पिंपळे गुरवमधील नदीपात्रातील भरावामुळे फुगेवाडीतील भागात पावसाचे पाणी शिरू शकते. त्याचा सुमारे एक ते दीड हजार नागरिकांना फटका बसू शकतो. त्यामुळे महापालिकेने याबाबत कडक पावले उचलावीत.
- प्रा. मनोज वाखारे, नागरिक, फुगेवाडी

Web Title: Fill in Pawana river