विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी तंत्रज्ञानावर भर - कुलगुरू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 मे 2017

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या केंद्रस्थानी हा विद्यार्थीच असेल. त्यांच्यासाठी मदत केंद्राची चांगली सुविधा देण्याबरोबरच मी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधेन. विद्यार्थ्यांना विद्यापीठात वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करून सक्षम यंत्रणा करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. 

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या केंद्रस्थानी हा विद्यार्थीच असेल. त्यांच्यासाठी मदत केंद्राची चांगली सुविधा देण्याबरोबरच मी स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधेन. विद्यार्थ्यांना विद्यापीठात वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून तंत्रज्ञानाचा वापर करून सक्षम यंत्रणा करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली. 

कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. विद्यापीठाचा कारभार विद्यार्थिभिमुख करण्यासाठी, तसेच अन्य सुधारणा करण्यासाठी काय करता येईल, यासंबंधी त्यांनी चर्चा केली. विद्यार्थी हा आपला पाल्य आहे असे समजून त्याला सेवा दिली जाईल, तशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. प्रश्‍न कोणतेही असोत, ते संवादाने सोडविले जातील. कुलगुरू कार्यालय हे विद्यार्थ्यांसाठी खुले राहील, असे त्यांनी सांगितले. 

जयकर ग्रंथालयातील अभ्यासिका चोवीस तास खुली ठेवण्याच्या मागणीबाबत डॉ. करमळकर म्हणाले, ""अभ्यासिका जास्त काळ खुली ठेवता येईल; परंतु सुरक्षेसंबंधी काही प्रश्‍न निर्माण होऊ शकतात, त्याचाही विचार केला पाहिजे. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ.'' 

मायग्रेशन, ट्रान्स्क्रिप्ट घेण्यासाठी विद्यार्थी वारंवार चकरा मारतात. तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्याचे प्रत्येक काम कमीत कमी वेळेत करण्याकडे कटाक्ष राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

विनाअनुदानित महाविद्यालये नॅक मूल्यांकन करून घेत नाहीत, या मुद्द्यावर बोलताना डॉ. करमळकर यांनी, नव्या कायद्यात मूल्यांकन सक्तीचे असल्याचे सांगितले. मूल्यांकन हे आता महाविद्यालयांच्या संलग्नतेशी जोडले आहे, ते करून घेतले नाही तर महाविद्यालयांची संलग्नता संपुष्टात येऊ शकते, त्यामुळे महाविद्यालय अनुदानित असो वा विनाअनुदानित, त्यांना मूल्यांकनाची प्रक्रिया टाळता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

ई-रिक्षा वाढविणार 
विद्यापीठात अंतर्गत ई-वाहतूक करण्याचा प्रयत्न आहेच. यापूर्वी ई-रिक्षा घेतलेली आहे. उद्योगांच्या (सीएसआर) मदतीने त्यांची संख्या वाढविली जाईल. शिक्षकांनी एक दिवस सायकलवर किंवा ई-रिक्षाचा वापर करावा, असाही प्रयत्न असेल. चांगल्या पायाभूत सुविधा आणि गुणवत्ता असलेल्या महाविद्यालयांशी संवाद साधून त्यांना स्वायत्तता घेण्याबाबत विद्यापीठ जागृती करेल, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले. 

Web Title: Filling technology for students' facilities