Video : यशस्वी झालो; प्रस्थापित व्हायचे नाही : नागराज मंजुळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

अमिताभ बच्चन खरंच खूप मोठे 
अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे चित्रीकरणादरम्यानचे अनेक किस्से मंजुळे यांनी या वेळी सांगितले. अमिताभ एक व्यक्ती आणि कलाकार म्हणून खूप मोठे आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याआधी खूप दडपण होते. ते नाराज होणार नाहीत, म्हणून आम्ही खूप तयारी करायचो; पण त्यांना चालेल की नाही, याची धाकधूक असायची. त्यांच्याबरोबर काम करताना आम्ही अगदी ‘सिन्सिअरली’ प्रयत्न केला; पण दोन दिवसांनंतर तेच आमच्यासारखे काम करू लागले अन्‌ आमचा ताण हलका झाला, अशी आठवण त्यांनी सांगितली.

पुणे - ‘पिस्तुल्या’पासून ‘सैराट’पर्यंत झालेला प्रवास.... ‘सैराट’ची सुचलेली कथा... ‘जब्या’ कसा सापडला..अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचा अनुभव....याची गुपितं उलगडतानाच उनाड विद्यार्थी, प्रख्यात दिग्दर्शक कसा झाला, याचे पैलू पुणेकरांसमोर शुक्रवारी उलगडत गेले ते संवेदनशील कवी असलेल्या नागराज मंजुळे यांच्या उत्तरोत्तर रंगत गेलेल्या मुलाखतीमधून. लौकिकार्थाने आज यशस्वी झालो असलो तरी प्रस्थापित व्हायचे नाही, तसा झालो तर तुम्ही दगड मारा, असे त्यांनी आवर्जून सांगितले. निमित्त होते ते ‘सकाळ’चे संस्थापक- संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीचे.

डॉ. परुळेकर जयंतीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्यसैनिक (कै.) ना. अ. पेंडसे पुरस्कृत ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कार’ ‘सकाळ’च्या ‘ऍग्रोवन’चे वरिष्ठ बातमीदार मनोज कापडे, तसेच नाशिक आवृत्तीमधील बातमीदार नरेश हळनोर आणि मुंबई आवृत्तीमधील बातमीदार प्रशांत कांबळे यांना मंजुळे यांच्या हस्ते या वेळी प्रदान करण्यात आला. तसेच वाहतूक नियमन करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या दीपा लोहोटेकर, लडाखमध्ये ५५५ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करणारे आशिष कासवदेकर, आपत्तीमधील नागरिकांसाठी कार्यरत प्रमोद बलकवडे, हरविलेल्या चार वर्षांच्या मुलीला तिच्या पालकांपर्यंत पोचविणारे संकेत कालगावकर आणि रेल्वे प्रवाशांच्या हक्कांसाठी ४० वर्षांपासून अधिक काळ कार्यरत असलेल्या हर्षा शहा या ‘सकाळ’च्या वाचकांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला. ‘सकाळ’ समूहाचे संचालक भाऊसाहेब पाटील, संचालक- संपादक श्रीराम पवार याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.

संपादक सम्राट फडणीस यांनी स्वागत-प्रास्ताविकात ‘सकाळ’च्या विस्तारणाऱ्या समाजोपयोगी विविध उपक्रमांची माहिती या वेळी दिली. ‘सकाळ’चे वरिष्ठ उपसंपादक मंदार कुलकर्णी आणि ‘साम’च्या प्रतिनिधी प्रेरणा जंगम यांनी मंजुळे यांची मुलाखत घेतली. 

कार्यक्रमासाठी बालगंधर्व रंगमंदिर ‘हाउसफुल’ झाले होते. त्यात युवक- युवतींची संख्या सर्वाधिक होती. महापौर मुक्ता टिळक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरही उपस्थित होते. मंजुळे यांच्या ‘पिस्तुल्या’,‘ फॅंड्री’, ‘सैराट’ या चित्रपटांची मोहिनी अद्याप असल्याचे याप्रसंगी दिसून आले, तर अमिताभ बच्चन यांच्याबरोबरील ‘झुंड’ या आगामी चित्रपटाबद्दलही रसिकांना कुतूहल असल्याचे जाणवले. ग्रामीण पार्श्‍वभूमी असलेल्या मंजुळे यांनी त्यांची वाटचाल कशी झाली, याचा आलेख मांडताना पुणेकरांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी प्रतिसाद दिला.  

उनाडपणामुळे दहावीत अनुत्तीर्ण झालो आणि तेथूनच करिअरला निर्णायक वळण मिळाले. कविता लेखनाची आवड लागली अन्‌ वाचनाचीही. त्याच काळात लेखन सुरू केले. त्यामुळे वैचारिक जडणघडण झाली. सोबत वडील पोपटराव आणि काका बाबूराव यांनी केलेल्या संस्कारांची शिदोरी होतीच. पदवीच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्यावर त्याला धार आली, असे सांगत मंजुळे यांनी त्यांचा जीवनपट उलगडला. 

राजकारणापासून दूरच राहणार .... 
चित्रपट क्षेत्रातील लोकप्रियतेमुळे राजकारणात येणार का, या प्रश्‍नाचे उत्तर मंजुळे यांनी अगदी एखाद्या मुरब्बी राजकारण्यासारखेच दिले. राजकारणी मंडळी खूप मेहनत करतात. राजकारणात उतरण्यासाठी तेवढी क्षमता असायला हवी. ती माझ्याकडे नाही. राजकारण करताना लोकांत जाऊन निवडून द्या म्हणावे लागते, ते मला आवडत नाही. लोकांनी म्हटले पाहिजे, तुम्ही योग्य आहात. स्वत:च तसे म्हणून काय उपयोग, अशी भूमिका त्यांनी मांडली; परंतु, राजकारणात यायचे असेल तर कोणत्या राजकीय पक्षाला पसंती देणार? यावर बोलणे त्यांनी टाळले. त्याचवेळी त्यांनी राजकारण्यांच्या सहनशीलतेचे कौतुकही केले.

असा सापडला ‘जब्या’
‘पिस्तुल्या’ या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविल्यानंतर ग्रामस्थांनी मंजुळे यांच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला होता. गावात कार्यक्रमासाठी पोचताच हलगी वाजवून सारे स्वागत करीत होते. हलगी वाजविणाऱ्यांत एका मुलाचा समावेश होता. गावातून व्यासपीठापर्यंत पोचेपर्यंत लोकांच्या नजरा माझ्याकडे होत्या आणि माझी नजर हलगी वाजविणाऱ्या त्या मुलाकडे होती. कार्यक्रमानंतर त्या मुलाला घेऊन कोपऱ्यात बोलत होतो. तेव्हाच तो ‘फॅंन्ड्री’ चित्रपटातील ‘जब्या’ची (सोमनाथ अवघडे) भूमिका करेल, असे ठरविले होते.

आधी होकार देणारा जब्या, त्यांच्या घरी गेल्यानंतर मात्र मला पाहून उसाच्या शेतात लपून बसायचा. आठ दिवसांनी त्याला धरून आणले आणि त्याची मनधरणी केली. त्यानंतर तो चित्रपटात काम करायला तयार झाला, असे मंजुळे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: film director nagraj manjules interview sakal event