राजकारणात येणार का? नागराज म्हणतो...(व्हिडिओ)

ज्ञानेश सावंत
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

चित्रपट क्षेत्रातील लोकप्रियतेमुळे राजकारणात येणार का, या प्रश्‍नाचे उत्तर एखाद्या मुरब्बी राजकारण्यांच्या शैलीत देत कवी, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता नागराज मंजुळे यांनी राजकारण्यासारखी क्षमता आपल्याकडे नसल्याचे सांगितले. मात्र, राजकारणात उतरणार का, तेव्हा कोणता पक्ष असेल, या प्रश्‍नांवर राजकीय नेत्यांचे कौतुक करीत, प्रश्‍नांची नेमकी उत्तरे देणे त्यांनी टाळले.

पुणे : चित्रपट क्षेत्रातील लोकप्रियतेमुळे राजकारणात येणार का, या प्रश्‍नाचे उत्तर एखाद्या मुरब्बी राजकारण्यांच्या शैलीत देत कवी, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता नागराज मंजुळे यांनी राजकारण्यासारखी क्षमता आपल्याकडे नसल्याचे सांगितले. मात्र, राजकारणात उतरणार का, तेव्हा कोणता पक्ष असेल, या प्रश्‍नांवर राजकीय नेत्यांचे कौतुक करीत, प्रश्‍नांची नेमकी उत्तरे देणे त्यांनी टाळले.

राजकारण करण्यासाठी लोकांत जाऊन निवडून द्या म्हणावे लागते, ते मला आवडत नाही. मात्र, तुम्ही योग्य आहात, असे लोकांनी म्हणायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त करताना राजकारणात येऊ शकू, असे आडवळणाने सांगण्याचा प्रयत्न मंजुळे यांनी केला. 

 

(कै.) नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमात मंजुळे यांची मुलाखत झाली. तेव्हा त्यांच्या शैणक्षिक, सामाजिक क्षेत्रांसह कवी, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता क्षेत्रांतील त्यांचे व्यक्तीमत्त्व उलगडले. पिस्तुल्या, फॅन्ड्री, सैराट चित्रपटासह आगामी काळात येणाऱ्या चित्रपटासंदर्भात मंजुळे यांनी मोकळेपणाने भूमिका मांडली. लोकप्रियतेच्या बळावर चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते राजकारणात "एन्ट्री' करतात, या पार्श्‍वभूमीवर निवेदक मंदार कुलकर्णी यांनी मुलाखतीदरम्यान, मंजुळे यांची राजकीय अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. 

पिस्तुल्या या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कराने गौरविल्यानंतर मंजुळे ग्रामस्थांनी सत्काराचा कार्यक्रम ठेवला, गावात कार्यक्रमासाठी पोचताच हलगी वाजवून माझे स्वागत करीत होते. हलगी वाजविणऱ्यांत एका मुलाचा समावेश होता; गावातून व्यासपिठापर्यंत पोचेपर्यंत लोकांच्या नजरा माझ्याकडे होत्या आणि माझी नजर हलगी वाजविणाऱ्या त्या मुलाकडे होती. पाहुणे व्यासपीठ गेले आणि त्या मुलाला घेऊन कोपऱ्यात बोलत होतो. तेव्हाच तो "फॅंन्ड्री' चित्रपटातील जब्याची (सोमनाथ अवघडे) भूमिका करेल, असे ठरविले होते. आधी होकार देणारा जब्या,त्यांच्या घरी गेल्यानंतर मात्र मला पाहून उसात लपून बसायचा. आठ दिवसांनी त्याला धरून आणले, चित्रपटाची माहिती देत राष्ट्रीय पुरस्कार मिळेल, असे सांगितले होते. 

चित्रपटसृष्टीतील "बिग बी' अमिताभ बच्चन यांच्यासोबतचे चित्रीकरणादरम्यानचे अनेक किस्से सांगत मंजुळे यांनी आपल्या मुलाखती हस्याची लकेर उमटविली. "अमिताभ यांच्यासोबत काम करण्याआधी खूप दडपण होते. ते नाराज होणार नाहीत, म्हणून खूप तयारी करायचा पण जमेल की नाही, याचीही धाकधूक होती. परंतु, चित्रीकरण करायचे असल्याने आम्ही एखाद्या "सिन्सिअर टीम'मधील कलाकारांशी वागण्याचे ठरविले होते. आम्ही अमिताभसारखे काम करण्याचा प्रयत्नात होतो, मात्र तेच आमच्यासारखेच काम करू लागले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: film director nagraj manjules interview of sakal event in Pune